- प्राप्तिकर विभागाने मुंबईतील शिल्पा शेट्टीच्या निवासस्थानी आर्थिक व्यवहारांची सखोल चौकशी सुरू केली आहे
- शिल्पाच्या बॅस्टियन रेस्टॉरंटमधील कर अनियमितता आणि आर्थिक व्यवहारांच्या संशयावर छापेमारी करण्यात आली आहे
- प्राप्तिकर विभागाने बेंगळुरूमधील शिल्पाच्या महागड्या बॅस्टियन पबवरही कर भरण्यात अनियमितता असल्याने छापा टाकला
आर्थिक व्यवहारांची सखोल चौकशी सुरू बॉलिवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टी पुन्हा एकदा कायदेशीर कचाट्यात सापडली आहे. तिच्या मुंबईतील निवासस्थानी प्राप्तिकर विभागाने (Income Tax) छापेमारी केली आहे. शिल्पाच्या मालकीच्या 'बॅस्टियन' रेस्टॉरंटमधील कथित कर अनियमितता आणि संशयास्पद आर्थिक व्यवहारांच्या चौकशीसाठी ही कारवाई करण्यात येत असल्याचे सूत्रांकडून समजते. प्राप्तिकर विभागाची पथके गेल्या अनेक तासांपासून शिल्पाच्या घरात आहे. शिवाय ते कागदपत्र आणि तिच्याशी संबंधीत संपत्तीची ही पडताळणी करत आहेत.
विशेष म्हणजे, मुंबईतील कारवाईच्या एक दिवस आधी प्राप्तिकर विभागाने बेंगळुरू येथील सेंट मार्क्स रोडवर असलेल्या शिल्पाच्या 'बॅस्टियन' पबवर छापा टाकला होता. हा पब शहरातील सर्वात महागड्या ठिकाणांपैकी एक मानला जातो. पबच्या संचालनात आणि कर भरणा प्रक्रियेत अनियमितता असल्याच्या तक्रारीनंतर ही पावले उचलण्यात आली आहेत. शिल्पा शेट्टी त्यामुळेच इन्कम टॅक्सच्या रडारवर आल्याचं बोललं जात आहे.
छापेमारी दरम्यान, 10 हून अधिक अधिकाऱ्यांच्या पथकाने रेस्टॉरंट आणि त्याच्याशी संबंधित कंपन्यांचे आर्थिक रेकॉर्ड आणि कर संबंधित कागदपत्रे ताब्यात घेतली आहेत. या चौकशीतून मोठी करचोरी उघड होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. शिल्पा शेट्टीवर झालेल्या या कारवाईमुळे बॉलिवूड हादरले आहे. काही वर्षापूर्वी शिल्पाचा पतीही चौकशीच्या फेऱ्यात अडकला होता. त्याला जेलवारी ही करावी लागली होती. त्यानंतर आता शिल्पा शेट्टी भोवती ह इन्कम टॅक्सने फास आवळला आहे.