मध्य रेल्वेच्या छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (CSMT) स्टेशनवर मोठा बदल होणार आहे. पुनर्विकास प्रकल्पाच्या पायाभूत कामांसाठी आणि सुरक्षा बॅरिकेड्स उभारण्यासाठी, प्लॅटफॉर्म क्रमांक 18 हा 1 ऑक्टोबर 2025 पासून सुमारे 3 महिन्यांसाठी बंद ठेवण्यात येणार आहे. यामुळे या प्लॅटफॉर्मवरून सुटणाऱ्या दोन महत्त्वाच्या एक्स्प्रेस गाड्यांच्या वेळापत्रकात बदल करण्यात आला असून त्या आता दादर पर्यंतच चालवण्यात येणार आहेत.
कोणत्या गाड्यांवर परिणाम होणार?
प्लॅटफॉर्म 18 बंद असल्यामुळे, या प्लॅटफॉर्मवरून नियमितपणे सुटणाऱ्या खालील दोन एक्स्प्रेस गाड्या आता दादर स्टेशनपर्यंतच चालवण्यात येतील. यामध्ये अमरावती-सीएसएमटी एक्स्प्रेस, बल्लारशाह-सीएसएमटी एक्स्प्रेस यांचा समावेश आहे. या गाड्या दादरपर्यंत धावणार असल्याने, CSMT येथून प्रवास करणाऱ्या सुमारे 1 लाख प्रवाशांना मोठा मनस्ताप सहन करावा लागण्याची शक्यता आहे.
पुनर्विकास प्रकल्पाची कारणे आणि स्वरूप
रेल्वे भूमी विकास प्राधिकरण (RLDA) मार्फत CSMT पुनर्विकास प्रकल्पासाठी तब्बल 2450 कोटी रुपयांचा खर्च केला जात आहे. या कामांतर्गत सीएसएमटीच्या सर्व प्लॅटफॉर्मवर विस्तारित डेक उभारण्यात येणार आहेत. यासाठी टप्प्याटप्प्याने सर्व प्लॅटफॉर्मवर पायलिंगचे काम केले जात आहे. याच कामासाठी प्लॅटफॉर्म 18 बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. सध्या सीएसएमटी येथे प्लॅटफॉर्म 11 ते 18 वरून दररोज सुमारे 20 ते 22 एक्स्प्रेस गाड्या धावतात.
पुनर्विकास प्रकल्पांतर्गत तयार होणाऱ्या या नव्या डेकवर प्रवाशांना अनेक आधुनिक सुविधा उपलब्ध होणार आहेत. यात तिकीट काउंटर, प्रवाशांसाठी प्रशस्त प्रतीक्षा क्षेत्र, खाद्यपदार्थांचे स्टॉल तसेच वरच्या मजल्यावर खरेदी आणि मनोरंजन केंद्रांच्या सुविधांचा समावेश असेल.
प्लॅटफॉर्म 12 आणि 13 लवकरच होणार खुला
रेल्वेने गेल्या वर्षी बंद केलेले प्लॅटफॉर्म 12 आणि 13 च्या विस्तारीकरणाचे काम आता अंतिम टप्प्यात आहे. मार्च महिन्यात नॉन-इंटरलॉकिंगची कामे पूर्ण झाली असून रेल्वे सुरक्षा आयुक्तांकडून सुरक्षा प्रमाणपत्रही रेल्वेला मिळाले आहे. लवकरच हे प्लॅटफॉर्म प्रवाशांसाठी खुले होण्याची शक्यता आहे.