प्रदूषणापासून फारकत घेत भारतासारख्या देशाची उर्जेची गरज कशी भागवता येईल यावर सखोल चर्चा होण्याची गरज आहे. हीच गरज ओळखून मुंबई क्लायमेट वीकचे आयोजन करण्यात येणार आहे. फेब्रुवारी महिन्यात हा सप्ताह आयोजित केला जाणार असून महाराष्ट्र सरकार व मुंबई महापालिकेच्या सहकार्याने मुंबई प्रोजेक्ट या कार्यक्रमाचे आयोजन करणार आहे. वेगाने विकास घडवून आणत असताना पर्यावरणाला नुकसान होणार नाही याची काळजी कशी घेता येईल याबद्दल मुंबई क्लायमेट वीकच्या मंचावर चर्चा घडवून आणण्याच येणार आहे. हरीत उर्जेवर धावणारी वाहने आणि सौर उर्जेचा वापर करून शेतीचा विकास हे दोन विषय या सप्ताहामध्ये प्रामुख्याने चर्चिले जाणार आहेत.
नक्की वाचा: पुण्यात शिमल्यापेक्षा जास्त थंडी; बुधवारी नाशिक, जळगावसाठी कडाक्याच्या थंडीचा इशारा
अपारंपरीक उर्जेसंदर्भात आशयघन चर्चा
भारतामध्ये इलेक्ट्रीक वाहनांची संख्या वाढू लागली आहे. मेट्रोसारख्या सार्वजनिक सेवा सुरू करत प्रदूषण कमी करण्यासाठी जाणीवपूर्वक प्रयत्न केले जात आहेत. वीज वाचवण्यासोबतच वीज निर्मितीसाठीही विविध संस्था, कंपन्या सातत्याने प्रयत्न करत आहेत. या संस्थांची आणि कंपन्यांची संख्या वाढताना दिसून येत असून ही सुखावणारी बाब आहे. हरीत उर्जा धोरण, ही धोरणे आणि सर्वसामान्य माणूस यासंदर्भातही मुंबई क्लायमेट वीकमध्ये चर्चा घडवून आणण्यात येणार आहे.
नक्की वाचा: पुण्यात संध्याकाळी 7 नंतर पेट्रोल, डिझेल मिळणार नाही ? नेमकं काय झालंय?
विकसनशील देश केंद्रस्थानी असणार
MCW अर्थात मुंबई क्लायमेट वीकमध्ये विकसनशील देशांमध्ये हरीत उर्जेची उपलब्धता आणि या उर्जेसाठी मोजावी लागणारी किंमत हे दोन कळीचे मुद्दे आहेत. याबद्दलही या सप्ताहामध्ये तज्ज्ञांकडून त्यांची मते जाणून घेण्याची संधी मिळेल. शाश्वत उर्जेचा अवलंब हा समाजातील वंचित घटकांच्या सक्षमीकरणासाठी कसा करता येईल याबद्दलही तज्ज्ञ आपली मते मांडतील.