देशातील सर्वात लांब डबल डेकर उड्डाण पुलाचे उद्घाटन केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते झाले. हा उड्डाणपुल चार पदरी आहे. अशा पद्धतीचा चार पदरी आणि डबल डेकर उड्डाणपूल हा पहिला ठरला आहे. हा मार्ग चार स्तरीय आहे. जमिनीवर राज्य महामार्ग आहे. दुसऱ्या स्तरावर रेल्वे मार्ग आहे. तिसऱ्या स्तरावर रस्ते वाहतुकीसाठी मार्ग करण्यात आला आहे. तर चौथ्या स्तरावर मेट्रो मार्गिक आहे. अशा पद्धतीचा देशातील एकमेव चार स्तरीय मार्ग नागपुरातील कामठी रोडवरील गुरुद्वारा सिंघ सभा जवळ प्रत्यक्षात साकार झाला आहे.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा)
नागपूरात आजपासून एलआयसी चौक ते ऑटोमोटीव्ह चौक डबल डेकर उड्डाणपूल वाहतुकीसाठी सुरु झाला आहे. हा मार्ग 5 किमी 670 मीटर लांबीचा आहे. देशात सर्वाधिक लांबीचा हा चार पदरी डबलडेकर उड्डाणपूल आहे. शिवाय सिंगल कॉलम पिअरवर उड्डाणपूल उभा असून स्थापत्य कलेचा अद्भूत नमुना म्हणावा लागेल. या प्रकल्पासाठी तब्बल 573 कोटी खर्च झाला आहे.
या मार्गात गड्डीगोदाम चौक,कडबी चौक,इंदोरा चौक,नारी रोड,ऑटोमोटिव्ह चौक ही पाच मेट्रो स्थानके बांधण्यात आली आहेत. रेल्वे ट्रॅक वरून जाताना या उड्डाणपुलासाठी गड्डीगोदाम येथील गुरुद्वाराजवळ 1650 वजन क्षमतेचा स्टीलचा पूल तयार करण्यात आला आहे. देशातील ही पहिली रचना आहे. ज्यामध्ये चार स्तरीय वाहतूक व्यवस्था आहे.
या उड्डाणपुलामुळे कामठी मार्गावरील तसेच नागपूर जबलपूर महामार्गावरील सततच्या प्रचंड वाहतूक कोंडीतून नागरिकांना बऱ्यापैकी दिलासा मिळणार आहे. कामठी,कन्हान,रामटेक तसेच उत्तर नागपूर या स्थानावरून येणाऱ्या -जाणाऱ्या नागरिकांना या उड्डाणपुलावरून थेट प्रवास करता येणार आहे. त्यामुळे वेळ व इंधनाचीही बचत होणार आहे. त्यामुळे हा उड्डाणपूल नागपुरकरांसाठी दिलासा देणारा ठरणार आहे.