Sushil kedia : मराठी भाषेवरून राज ठाकरे यांना भिडणाऱ्या सुशील केडिया यांचं ऑफिस मनसे कार्यकर्त्यांना फोडल्याची माहिती समोर येत आहे. सुशील केडिया यांनी राज ठाकरे यांचा एकेरी उल्लेख करत थेट राज ठाकरे यांनाच आव्हान दिलं होतं. सुशील केडिया यांनी ट्वीट करत मराठी न शिकण्याची प्रतिज्ञाच केली होती. शिवाय काय करायचं आहे ते कर, असा एकेरी उल्लेख करत थेट राज ठाकरे यांनाच आव्हान दिलं आहे.
सुशील केडिया यांचं ऑफिस नारळ फेकून फोडण्यात आलं आहे. माथाडी कामगार सेनेचे कार्यकर्त्यांनी सुशील केडियाचं ऑफिस फोडल्याची माहिती, मनसे पदाधिकारी सचिन गोळे यांनी दिली. "आज आम्ही केडियाचं ऑफिस फोडलं, उद्या घरी जायलाही घाबरणार नाही. सुशील केडियाला धडा शिकवल्याशिवाय शांत बसणार नाही", असा इशाराही गोळे यांनी दिला.
(नक्की वाचा- Sushil Kedia: 'मी प्रतिज्ञा करतो मराठी शिकणार नाही, काय करायचंय ते कर, ठाकरेंना भिडणारा 'तो' कोण?)
"मला माझ्या माथाडी कामगार सेनेच्या कार्यकर्त्यांचा अभिमान आहे, त्यांचं अभिनंदन करतो. केडिया नावाचा भेडिया गेली दोन दिवस गरळ ओकत आहे. राज साहेबांना त्याने आव्हान दिलं होतं. मराठी भाषेला आणि मराठी संस्कृतीला त्याने आव्हान दिलं होतं. मागील 30 वर्ष महाराष्ट्रात पैसे कमावतोय, मात्र त्याला मराठी येत नाही, हे आपलं दुर्दैव आहे. अशा माणसांना मराठीचा अपमान करायचा असेल कर यासाठी ठोस कायदा तयार केला पाहिजे. नाहीतर राज ठाकरेंचे महाराष्ट्र सैनिक अशांना धडा शिकवण्यासाठी तयार आहेतच, असं सचिन गोळे यांनी म्हटलं.
काय आहे प्रकरण?
सुशील केडीया हे एक गुंतवणूकदार आहेत. गेल्या 30 वर्षापासून ते मुंबईत आपला व्यावसाय करतात. त्यांनी मराठीबाबत एक ट्वीट करत एकच खळबळ उडवून दिली आहे. त्यांनी एक ट्वीट केलं आहे. त्यात ते म्हणाले आहेत की आय डोन्ट लव्ह मराठी, आय डोन्ट लर्न मराठी, क्या करना है बोल. त्यांनी या ट्वीटमध्ये राज ठाकरे यांचा एकेरी उल्लेख केला आहे. मी 30 वर्ष मुंबईत राहतो. पण मला मराठी निट समजत नाही. मला मराठी आवडत नाही. मी ती शिकणार नाही अशी प्रतिज्ञा करतो. काय करायचं आहे ते कर असं त्यांनी ट्वीटमध्ये म्हटलं आहे.