मुंबईमध्ये 11 ते 21 ऑगस्ट 2025 या कालावधीत 18 व्या आंतरराष्ट्रीय खगोलशास्त्र आणि खगोलभौतिकी ऑलिम्पियाडचे (International Astronomy and Astrophysics Olympiad - IOAA 2025) आयोजन करण्यात आले आहे. तब्बल एका दशकानंतर ही जागतिक दर्जाची विज्ञान स्पर्धा पुन्हा मुंबईत आयोजित करण्यात येत आहे. या स्पर्धेत सहभागी होण्यासाठी जगभरातील 64 देशांमधून सुमारे 300 विद्यार्थी स्पर्धक आणि त्यांचे 140 मार्गदर्शक/शिक्षक मुंबईत दाखल झाले आहेत.
( नक्की वाचा: कदमला दिलेली केस बंद होणार? प्रिया बापट दिसणार दमदार लेडी सिंघमच्या भूमिकेत )
TIFR आणि HBCSE तर्फे स्पर्धेचे आयोजन
या स्पर्धेचे आयोजन टाटा मूलभूत संशोधन संस्थेच्या (TIFR) होमी भाभा विज्ञान शिक्षण केंद्राने (HBCSE) केले आहे. पंतप्रधान कार्यालय आणि केंद्रीय अणुऊर्जा विभागाने या स्पर्धेचे आयोजन करण्यात महत्त्वाची भूमिका बजावली आहे. ही केवळ एक स्पर्धा नसून जगभरातील वैज्ञानिक प्रतिभेचा उत्सव आहे. यातून आंतरराष्ट्रीय स्तरावर वैज्ञानिक सहकार्य आणि ज्ञानाची देवाणघेवाण केली जाईल. विशेषतः, खगोलशास्त्रामध्ये भारत जी प्रगती करत आहे, ती जगासमोर मांडण्याची ही एक सुवर्णसंधी आहे असे केंद्रीय अणुऊर्जा विभागाचे म्हणणे आहे.
विविध देशातील विद्यार्थ्यांना भारतीय संस्कृती अनुभवता येणार
या कार्यक्रमाच्या निमित्ताने जगातील विविध खंडांतील विद्यार्थी एकाच ठिकाणी एकत्र येणार आहेत. अनेक स्पर्धक पहिल्यांदाच भारताला भेट देत असल्यामुळे, त्यांच्यासाठी हा अनुभव निश्चितच अविस्मरणीय असेल. यामुळे त्यांना केवळ विज्ञानाचे ज्ञानच नाही, तर भारतीय संस्कृती आणि परंपरा जवळून अनुभवण्याची संधीही मिळेल. या स्पर्धेत सहभागी होणारी मुलं-मुली हे उद्याचे मोठे खगोलशास्त्री बनतील आणि नवनवे शोध लावतील असा विश्वास असून ही स्पर्धा त्यासाठी महत्त्वाची भूमिका बजावणारी ठरणार आहे.
12 ऑगस्ट रोजी उद्घाटन सोहळा
या ऑलिम्पियाडच्या कार्यक्रमांची रूपरेषाही आखण्यात आली आहे. 12 ऑगस्ट रोजी जिओ वर्ल्ड कन्व्हेन्शन सेंटर येथे उद्घाटन सोहळा होणार आहे. या सोहळ्याला भारत सरकारचे मुख्य वैज्ञानिक सल्लागार प्रा. अजय सूद प्रमुख पाहुणे म्हणून, तर आंतरराष्ट्रीय खगोलशास्त्रीय संघटनेचे (International Astronomical Union) माजी उपाध्यक्ष प्रा. अजित केंभवी सन्माननीय पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत. स्पर्धेचा समारोप सोहळा 21 ऑगस्ट रोजी नीता मुकेश अंबानी सांस्कृतिक केंद्रात (NMACC) पार पडेल. या सोहळ्याला अंतराळ विभागाचे सचिव डॉ. व्ही. नारायणन आणि भारतीय अंतराळ संशोधन संस्थेचे (ISRO) प्रमुख उपस्थित राहतील, तर डॉ. अनिल काकोडकर यांना देखील विशेष अतिथी म्हणून आमंत्रित करण्यात आले आहे.
( नक्की वाचा: मुलीच्या वाढदिवसाला भेट दिला व्हायब्रेटर, अभिनेत्रीने अभिमानाने सांगितला किस्सा )
2006 मध्ये थायलंडमधील चियांग माई येथे सुरू झालेली ही ऑलिम्पियाड स्पर्धा जगभरात माध्यमिक स्तरावरील विद्यार्थ्यांमध्ये खगोलशास्त्राची आवड निर्माण करत आहे. मुंबईमध्ये होणारी ही स्पर्धा देशातील तरुण पिढीला खगोलशास्त्रात करिअर करण्यासाठी प्रोत्साहन देईल आणि भारताची वैज्ञानिक प्रतिमा जगासमोर अधिक उंचावेल अशी अपेक्षा आहे.