Fake Paneer: हॉटेलमध्ये पनीर मागवताना आता 'मेन्यू कार्ड' नीट वाचा; राज्य सरकारचा ग्राहकांसाठी मोठा निर्णय

Paneer Adulteration : ग्राहकांच्या आरोग्याशी आणि खिशाशी होणारी ही फसवणूक थांबवण्यासाठी अन्न व औषध प्रशासनाने (FDA) एक अत्यंत मोठा आणि कडक निर्णय घेतला आहे

जाहिरात
Read Time: 2 mins
Paneer Adulteration : येत्या 1 मे पासून राज्यभर हा नियम लागू होणार आहे.
मुंबई:

Is Your Paneer Real or Fake?: हॉटेलमध्ये गेल्यावर आपण आवडीने पनीरची भाजी किंवा चीज सँडविच मागवतो, पण तुमच्या ताटात येणारं ते पनीर खरंच दुधापासून बनलेलं आहे की रासायनिक प्रक्रियेतून तयार झालेलं 'भेसळयुक्त' पनीर आहे? हा प्रश्न आता प्रत्येक खवय्याला पडणार आहे. ग्राहकांच्या आरोग्याशी आणि खिशाशी होणारी ही फसवणूक थांबवण्यासाठी अन्न व औषध प्रशासनाने (FDA) एक अत्यंत मोठा आणि कडक निर्णय घेतला आहे. आता हॉटेलमालकांना त्यांच्या मेन्यू कार्डवर ग्राहकांपासून काहीही लपवता येणार नाही.

येत्या 1 मे पासून म्हणजेच महाराष्ट्र दिनापासून राज्यातील सर्व हॉटेल्स, रेस्टॉरंट्स आणि खाद्यपदार्थ विक्रेत्यांसाठी एक नवीन नियमावली लागू होणार आहे.

काय आहे नवीन नियम?

अन्न सुरक्षा आयुक्त श्रीधर दुबे-पाटील यांनी जाहीर केल्यानुसार, एखादे हॉटेल अस्सल पनीर किंवा चीजऐवजी 'चीज ॲनालॉग' (Cheese Analogue) वापरत असेल, तर त्यांना तशी स्पष्ट घोषणा करावी लागेल. केवळ तोंडी सांगून चालणार नाही, तर हॉटेलचा मेन्यू कार्ड, दर्शनी भागावरील बोर्ड आणि अगदी ग्राहकांना मिळणाऱ्या बिलावरही 'ॲनालॉग'चा वापर केल्याचा उल्लेख असणे अनिवार्य आहे.

Advertisement

( नक्की वाचा : Mumbai Pune Expressway: इराण-इस्रायल युद्धाचा मुंबई-पुणे एक्सप्रेसवेला का बसतोय फटका? जाणून घ्या नेमकी अडचण )
 

पनीर आणि ॲनालॉगमध्ये नक्की फरक काय?

अनेकांना पनीर आणि ॲनालॉग हे सारखेच वाटतात, पण त्यात जमीन-अस्मानाचा फरक आहे. अस्सल पनीर हे पूर्णपणे दुधापासून बनवले जाते. याउलट, 'चीज ॲनालॉग' किंवा 'डेअरी ॲनालॉग' तयार करताना खाद्य तेल, स्टार्च आणि इतर रसायनांचा वापर केला जातो. ते दिसायला आणि चवीला पनीरसारखेच असले तरी त्यात दुधाचे पोषण मूल्य नसते. 

हे पदार्थ आरोग्याला घातक नसले तरी, पनीरच्या नावाखाली स्वस्त पर्याय विकून ग्राहकांची होणारी आर्थिक फसवणूक रोखणे हा एफडीएचा मुख्य उद्देश आहे.

फसवणूक केल्यास कडक कारवाई

अन्न सुरक्षा आणि मानके कायदा 2006 नुसार, ग्राहकांना आपण काय खात आहोत हे जाणून घेण्याचा पूर्ण अधिकार आहे. अनेक हॉटेलमध्ये पनीरच्या नावाखाली हे स्वस्त पर्याय वाढले जात असल्याच्या तक्रारी एफडीएकडे आल्या होत्या. 

आता नवीन नियमांचे उल्लंघन करणाऱ्या हॉटेलमालकांवर, कॅटरर्सवर आणि अगदी उत्पादन करणाऱ्या कंपन्यांवरही कडक कायदेशीर कारवाई केली जाणार आहे. पॅकेटवर सुद्धा 'पनीर' सारखे दिसणारे शब्द न वापरता स्पष्टपणे 'डेअरी ॲनालॉग' असे लिहावे लागणार आहे.

Advertisement

ग्राहकांनो, तुम्हीही व्हा सतर्क

केवळ नियम करून प्रशासन थांबलेले नाही, तर त्यांनी ग्राहकांसाठीही काही सूचना दिल्या आहेत. पॅकबंद पनीर खरेदी करताना त्यावर 'ॲनालॉग' हा शब्द आहे का, हे तपासून पहा. हॉटेलमध्ये गेल्यावर मेन्यू कार्ड नीट वाचा आणि पनीर व ॲनालॉग स्वतंत्रपणे दिले आहेत का याची खात्री करा. शंका आल्यास विक्रेत्याला थेट प्रश्न विचारा आणि बिलाची मागणी करा. तुमच्या ताटात येणाऱ्या अन्नाची शुद्धता तपासणे हा तुमचा हक्क आहे.

Topics mentioned in this article