जाहिरात

Mumbai Pune Expressway: इराण-इस्रायल युद्धाचा मुंबई-पुणे एक्सप्रेसवेला का बसतोय फटका? जाणून घ्या नेमकी अडचण

Mumbai Pune Expressway: मुंबई आणि पुणे  या राज्यातील दोन महत्त्वाच्या महानगरांना जोडणाऱ्या एका अत्यंत महत्त्वाकांक्षी प्रकल्पाला इराण-इस्रायल युद्धाचा फटका बसला आहे.

Mumbai Pune Expressway: इराण-इस्रायल युद्धाचा मुंबई-पुणे एक्सप्रेसवेला का बसतोय फटका? जाणून घ्या नेमकी अडचण
Mumbai Pune Expressway: युद्धातील संकटाचा थेट परिणाम या प्रकल्पावर झाला आहे.
मुंबई:

Mumbai Pune Expressway: मुंबई आणि पुणे  या राज्यातील दोन महत्त्वाच्या महानगरांना जोडणाऱ्या एका अत्यंत महत्त्वाकांक्षी प्रकल्पाचे काम आता 99 टक्के पूर्ण झाले असून हा मार्ग उद्घाटनासाठी सज्ज झाला आहे. तब्बल 30 वर्षांचे नियोजन आणि 8 वर्षांच्या अहोरात्र मेहनतीनंतर साकारलेला हा 'मिसिंग लिंक' प्रकल्प 1 मे रोजी म्हणजेच महाराष्ट्र दिनी जनतेसाठी खुला करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. मात्र, काम अगदी शेवटच्या टप्प्यात आले असतानाच तब्बल 3,000 किलोमीटर लांब असलेल्या इराणमधील युद्धाचा फटका या प्रकल्पाला बसला आहे. या युद्धामुळे प्रकल्पासाठी लागणाऱ्या एका महत्त्वाच्या घटकाचा पुरवठा विस्कळीत झाला असून, शेवटचा अडथळा दूर करण्याचे मोठे आव्हान उभे राहिले आहे.

मुंबई-पुणे एक्सप्रेसवेवरील 13.3 किलोमीटर लांबीच्या या 'मिसिंग लिंक' प्रकल्पातील बोगदे आणि रस्त्यांचे काम पूर्ण झाले असले, तरी पुलांवरील डांबरीकरणाचा अखेरचा टप्पा युद्धाच्या सावटाखाली अडकला आहे.

काय आहे अडचण?

मिसिंग लिंकच्या या मार्गावरील केबल स्टे ब्रिजचे मुख्य काम मार्च 2026 मध्ये पूर्ण झाले. आता केवळ या पुलांच्या पृष्ठभागावर डांबराचा थर (Bitumen Surfacing) चढवण्याचे काम बाकी आहे. मात्र, इराण, अमेरिका आणि इस्रायल यांच्यातील वाढत्या तणावामुळे आखाती देशांतून होणारा डांबराचा पुरवठा विस्कळीत झाला आहे. भारत आपल्या गरजेच्या डांबरापैकी मोठ्या प्रमाणात आयात करतो आणि त्यातील 95 टक्के साठा हा इराण, इराक, ओमान आणि संयुक्त अरब अमिरातीमधून येतो. युद्धाच्या संकटामुळे डांबराच्या किमतीत 50 टक्क्यांहून अधिक वाढ झाली आहे, ज्याचा थेट परिणाम या प्रकल्पाच्या अंतिम टप्प्यावर झाला आहे.

(नक्की वाचा : 60 फूट खोल खड्डा आणि 50 तासांचा थरार! 20 वर्षांपूर्वी मृत्यूला हरवणारा Borewell Boy 'प्रिन्स' आता काय करतो? )

होर्मुझच्या सामुद्रधुनीतील तणावाचा फटका

जागतिक इंधन आणि डांबर पुरवठ्यासाठी अत्यंत महत्त्वाची मानली जाणारी 'होर्मुझची सामुद्रधुनी' सध्या युद्धामुळे धोक्यात आली आहे. फेब्रुवारी आणि मार्च 2026 मध्ये या मार्गावरून होणारी मालवाहू जहाजांची वाहतूक अनेकदा ठप्प झाली. याचा फटका केवळ मुंबई-पुणे मिसिंग लिंकलाच नाही, तर हिमाचल प्रदेश आणि गुरुग्राममधील रस्ते प्रकल्पांनाही बसला आहे. महाराष्ट्रात डांबराचा तुटवडा निर्माण झाल्याने शेवटच्या टप्प्यातील काम महागले असून, कंत्राटदारांना चढ्या दराने डांबर खरेदी करून काम पूर्ण करावे लागत आहे.

प्रवासाचा वेळ आणि अंतर वाचणार

वेळेची मोठी बचत: हा मार्ग खुला झाल्यावर प्रवाशांचा 25 ते 30 मिनिटांचा वेळ वाचणार आहे.
अंतर होणार कमी: मुंबई-पुणे दरम्यानचे अंतर 5.7 किलोमीटरने कमी होईल.
वेगवान प्रवास: या नवीन मार्गावर ताशी 120 किलोमीटर वेगाने प्रवास करण्याची मुभा असेल.
कोंडीतून सुटका: एक्सप्रेसवेवरील एकूण वाहतुकीपैकी 70 टक्के वाहने पहिल्याच दिवसापासून या नवीन मार्गाचा वापर करतील असा अंदाज आहे.

( नक्की वाचा : Kedarnath Temple: केदारनाथचं शिवलिंग त्रिकोणी का? महाभारतातील 'त्या' घटनेचा आहे संबंध! वाचा संपूर्ण कथा )

30 वर्षांची प्रतीक्षा संपणार?

मिसिंग लिंक प्रकल्पाचा विचार सर्वप्रथम 1995 मध्ये मांडण्यात आला होता, तर 2018 मध्ये याच्या बांधकामाला प्रत्यक्ष सुरुवात झाली. कोरोना महामारीचे संकट आणि सह्याद्रीच्या दऱ्यांमधील ताशी 180 किलोमीटर वेगाने वाहणाऱ्या वाऱ्यांचा सामना करत अभियंत्यांनी हे आव्हान पेलले आहे. आता केवळ डांबरीकरणाचा अखेरचा थर बाकी असून, 1 मे या मुदतीपूर्वी हे काम पूर्ण करण्यासाठी प्रशासनाकडून प्रयत्न सुरू आहेत.
 

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com