Maharashtra Election 2026: महाराष्ट्रातील 29 महानगरपालिकांच्या निवडणुकीत महायुतीने मिळवलेल्या घवघवीत यशाचे पडसाद आता दक्षिणेतही उमटले आहेत. तमिळनाडू भाजपचे आक्रमक नेते के. अण्णामलाई यांनी ट्विट करत महाराष्ट्रातील मतदारांचे आभार मानले आहेत.
तमिळनाडू भाजपचे प्रदेशाध्यक्ष के. अण्णामलाई यांनी महाराष्ट्रातील महानगरपालिका निवडणुकीत महायुतीला मिळालेल्या ऐतिहासिक विजयाबद्दल आनंद व्यक्त केला आहे. त्यांनी या विजयाला 'कर्तृत्ववान प्रशासनाचा जनादेश' असे संबोधत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाचे कौतुक केले आहे.
अण्णामलाई यांच्या प्रतिक्रियेतील महत्त्वाचे मुद्दे
अण्णामलाई यांनी म्हटले की, "महाराष्ट्रातील जनतेने दिलेला निकाल हा सडेतोड आहे. महायुतीचा हा विजय म्हणजे केवळ आकड्यांचा खेळ नसून, कामगिरीवर आधारित प्रशासनाला मिळालेला कौल आहे. ग्रामीण भागापासून ते महानगरांपर्यंत जनतेने 'ट्रिपल इंजिन' नेतृत्वावर विश्वास दाखवला आहे. हा विश्वास प्रगतीवर आधारित असून विभाजनाच्या राजकारणाला मिळालेली चपराक आहे, असं म्हणत अण्णामलाई यांनी राज-उद्धव ठाकरे यांनाही टोला लगावला.
(नक्की वाचा- TMC Election 2026: ठाण्याचा 'गड' शिंदेंकडेच! महायुतीला निर्विवाद बहुमत; वाचा 131 नगरसेवकांची संपूर्ण यादी)
देवेंद्र फडणवीसांचे कौतुक
अण्णामलाई यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाचा उल्लेख केला. फडणवीस यांनी प्रत्येक स्तरावर प्रशासनाची व्याख्या बदलली असून त्यांच्या नेतृत्वामुळेच हे यश शक्य झाल्याचे त्यांनी म्हटले.
(नक्की वाचा- Vasai Virar Election Results 2026: वसई-विरारमध्ये हितेंद्र ठाकूरच 'किंग'; विजयाचा गुलाल मात्र फिका, कारण...))
जागतिक महासत्ता म्हणून महाराष्ट्राचा उदय
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दूरदृष्टीमुळे महाराष्ट्र एक जागतिक शक्ती म्हणून वेगाने समोर येत आहे. अण्णामलाई यांनी महाराष्ट्र भाजपच्या सर्व कार्यकर्त्यांचे अभिनंदन करताना हा विजय विकासाच्या राजकारणाला नवी दिशा देणारा असल्याचे सांगितले.