- नेप्च्यून स्वराज सोसायटीत मद्यपी तरुणांनी वाद निर्माण करून सेक्रेटरी सुरेश उपाध्यय यांना मारहाण केली
- होळीच्या दिवशी संकेत जाधव, सुशांत जाधव, राहुल पाटील यांनी उपाध्यय यांच्या मुलाला मारहाण केली
- मध्यस्थी करायला गेलेल्या सुरेश उपाध्यय आणि शशिकांत गुप्ता यांनाही त्या तरुणांनी गंभीर मारहाण केली
अमजद खान
सोसायटीचा सेक्रेटरी असताना मद्यपी तरुणांना इतकेच सांगितले की , दारु पिऊन सोसायटीत येऊ नका. यावरुन वाद झाला होता. मात्र या वादाचा राग होळीच्या दिवशी काढण्यात आला. मद्यपी तीन तरुणांनी त्याच सेक्रेटरीच्या मुलाला मारहाण केली. मध्यस्थी करायला गेलेल्या सेक्रेटरी यांना ही त्या तरुणांनी मारहाण केली. अन्य एका रहिवाशाला ही त्यांनी चोप दिला. या प्रकरणी टिटवाळा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. या मारहाणीची संपूर्ण घटना सीसीटीव्हीत कैद झाली आहे. सोसायटीत गुंडगिरी करणाऱ्यांच्या विरेाधात ठोस कारवाई केली जात नसल्याचा आरोप पिडित नागरीकांनी टिटवाळा पोलिसांवर केला आहे. होळीच्याच दिवशी हा वाद झाला.
टिटवाळ्यात नेप्च्यून स्वराज सोसायटी आहे. काही महिन्यापूर्वी सुरेश उपाध्यय हे या सोसायटीत सेक्रेटरी होते. एका दिवशी सोसायटीत काही रहिवासी तरुण दारु पिऊन सोसायटीत आले. त्यांनी धिंगाणा घातला. यावरुन सेक्रेटरी असल्याने उपाध्याय यांनी मद्यपी तरुणांना समज दिली. या वादानंतर संकेत जाधव या तरुणाने सुरेश उपाध्याय यांच्या गाडीची काच फोडली होती. संकेत याने या प्रकरणी माफी मागितल्याने या प्रकरणात पोलिसात तक्रार केली गेली नाही.
पण हा वाद तिथेच मिटला नव्हता. झालेल्या आपमानाची धग या तरुणांच्या मनात होती. त्यांना आणखी बदला घ्यायचा होता. ते त्यासाठी संधीच्या शोधात होते. मंगळवारी होळी असताना संकेत जाधव, सुशांत जाधव, राहुल पाटील या तिघांनी जुन्या वादाच्या रागातून सुरेश उपाध्याय यांचा मुलगा अमन याला बोलावून घेतले. त्यानंतर त्याला बेदम मारहाण केली. कसा बसा आमन हा तिघांच्या तावडीतून सुटला. पळून जात असताना त्या तिघांनी अमनचा पाठलाग केला. आमन सोसायटीच्या आवारात घुसला. काही तरी गडबड झाली आहे हे त्यावेळी तिथे उपस्थित असलेल्या रहिवाशांच्या लक्षात आले.
तिथे अमनचे वडील सुरेश उपाध्याय उपस्थित होते. शिवाय त्यांच्या शेजारी राहणारे शशिकांत गुप्ता हे तिथे होते. त्यांनी या वादात मध्यस्थी करण्याचा प्रयत्न केला. त्यांनी हल्ला करण्यासाठी आलेल्या त्या तीन तरुणांना अडवण्याचा प्रयत्न केला. पण त्या तिघांनी सेक्रेटरी सुरेश आणि त्यांचे सहकारी शशिकांत गुप्ता यांना ही मारहाण करण्यास सुरुवात केली. या मारहाणीत गुप्ता यांना गंभीर दुखापात झाली आहे. त्यांच्या डोक्याला सहा टाके पडले आहे. या प्रकरणात टिटवाळा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस ठोस कारवाई करत नाहीत असा आरोप पिडीत कुटुंबीयांनी केला आहे.