- कल्याण डोंबिवली महापालिका निवडणुकीत शिवसेना शिंदे गटाने ५३ आणि भाजपने ५० जागा जिंकल्या आहेत
- निवडणुकीत कोणत्याही पक्षाला बहुमत न मिळाल्यामुळे महापौर कोणाची याची चर्चा आहे
- शिंदे गटाचे जिल्हा प्रमुख गोपाळ लांडगे यांनी महापौरपदासाठी संख्येवर आधारित निर्णय होणार असल्याचे स्पष्ट केले
अमजद खान
कल्याण डोंबिवली महापालिकेची निडणूक भाजप आणि शिवसेना शिंदे गट युतीत लढले. त्यानंतर निवडणुकीत महायुतीने मोठा विजय मिळवला. कोणत्या एका पक्षाला बहुमत जरी मिळाले नसले तरी शिंदे सेना आणि भाजपला स्पष्ट बहुमत आहे. शिवसेना शिंदे गट 53 जागा जिंकत सर्वात मोठा पक्ष ठरला आहे. तर भाजपने 50 जागा जिंकल्या आहेत. त्यानंतर महापौर कुणाचा याची चर्चा कल्याण डोंबिवलीत सुरू झाली. भाजपने अडीच वर्षासाठी महापौरपद मिळावं अशी मागणी केली. त्यानंतर आता महापौर कोणाचा होणार या चर्चेवर शिवसेना शिंदे गटाने स्पष्टीकरण देत पूर्णविरामच दिला आहे.
शिवसेना शिंदे गटाचे कल्याण जिल्हा प्रमुख गोपाळ लांडगे यांनी महापौरपदाबाबत मोठं वक्तव्य केलं आहे. शिंदे सेना ही युतीतच राहणार आहे. आम्ही निवडणुका युतीत लढलो आहे. प्रत्येक पक्ष हा त्यांचा महापौर बनवण्यासाठी प्रयत्नशील आहे. परंतू संख्येला महत्व आहे. ज्यांची संख्या जास्त त्यांचा महापौर होणार हे स्पष्ट आहे असं ते म्हणाले. ज्या ठिकाणी शिदें सेनेची संख्या जास्त आहे, त्याठिकाणी शिंदे सेनेचाच महापौर होणार अशी माहिती लांडगे यांनी दिली आहे.
कल्याण डोंबिवली महापालिकेत शिंदे सेनेचे 53 नगरसेवक निवडून आले आहेत. भाजपचे 50 नगरसेवक निवडून आले आहेत. महापौर कोणाचा होणार? या बाबत जिल्हा प्रमुख लांडगे यांच्याकडे विचारणा केली असता त्यांनी सांगितले की, महापौर पदाची निवडणूक 3 फेब्रुवारी रोजी होणार आहे. महापौरपदासाठी उमेदवारी अर्ज 29 आणि 30 जानेवारी रोजी भरले जाणार आहेत. त्यादिवशी चित्र स्पष्ट होणार आहे. शिंदेसेना आणि भाजप युतीत निवडणूका लढले आहेत. मात्र राजकारणात संख्येला महत्व असते हे सांगायला ते विसरले नाहीत.
ज्यांची संख्या जास्त त्यांचा महापौर होणार. शिंदे सेनेची संख्या ज्या ठिकाणी जास्त आहे. त्याठिकाणी शिंदेसेनेचा महापौर होणार असे लांडगे यांनी सांगितले. भाजपने कोणत्या पदांची मागणी केली आहे ? याबाबत लांडगे यांना विचारले असता त्यांनी सांगितले की, युतीबाबत बोलणी सुरु आहे. त्याचा अंतिम निर्णय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि भाजपचे प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण घेणार आहे. त्यानंतर निर्णय जाहिर केला जाणार आहे.