Kalyan Dombivli News : कल्याण-डोंबिवली शहरातील नागरिकांची पाणी टंचाईची समस्या कायमस्वरूपी सोडवण्यासाठी *काळू धरण* प्रकल्पाला लवकरच चालना दिली जाईल, अशी मोठी हमी राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शनिवारी दिली. हे धरण अस्तित्वात आल्यास कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेला पाण्यासाठी एक स्वतंत्र आणि मोठा स्रोत उपलब्ध होईल, ज्यामुळे येथील लाखो रहिवाशांना मोठा दिलासा मिळणार आहे.
काय म्हणाले उपमुख्यमंत्री?
उपमुख्यमंत्री शिंदे यांनी यावेळी स्पष्ट केले की, ते मुख्यमंत्री असताना, काळू धरणाच्या कामाला गती देण्यासाठी एमएमआरडीएच्या (MMRDA) माध्यमातून जवळपास 500 कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला होता. या महत्त्वाकांक्षी प्रकल्पाच्या कामाला पुन्हा चालना देण्यासाठी त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे आग्रह धरला आहे. काळू धरणाला त्वरित चालना मिळाल्यास, कल्याण-डोंबिवलीला हे धरण मिळणार असून, पाणी समस्येवर कायमस्वरूपी तोडगा निघेल. ते म्हणाले की, या प्रकल्पासाठी निधीची कमतरता भासू देणार नाही.
महत्त्वाच्या विकासकामांचे भूमिपूजन आणि लोकार्पण
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते डोंबिवलीमध्ये वेगवेगळ्या महत्त्वाच्या प्रकल्पांचे भूमिपूजन आणि लोकार्पण पार पडले. यामध्ये डोंबिवलीतील संत सावळाराम क्रीडा संकुलात देशातील पहिल्या 'व्हर्टिकल स्पोर्ट' संकल्पनेतून उभारण्यात येणाऱ्या बहुमजली इनडोअर आणि आऊटडोअर इमारतीचे भूमिपूजन करण्यात आले.
तसेच, सावित्रीबाई फुले नाट्यगृह नूतनीकरण कामाचे भूमिपूजन आणि 'प्रेरणा वॉर मेमोरिअल' या स्मारकाचे लोकार्पणही यावेळी करण्यात आले.
( नक्की वाचा : Dombivli News : 'तुम्ही घर सोडा, नाहीतर सोडणार नाही'; डोंबिवलीत 90 वर्षांच्या आजीबाईंना भूमाफियांची धमकी )
विकासाला गती आणि विरोधकांवर टीका
यावेळी बोलताना उपमुख्यमंत्री शिंदे यांनी महाविकास आघाडी सरकारवर टीका केली आणि 'महाविकास आघाडी हे स्थगिती सरकार होते, मात्र महायुतीने विकासाला गती दिली', असे सांगितले. विकासकामांसाठी कधीही निधी कमी पडू दिला नाही. तसेच, 'कोणीही आला तरी लाडकी बहीण योजना कधीही बंद पडू देणार नाही', याचा पुनरुच्चार त्यांनी केला.
खासदार श्रीकांत शिंदे यांच्या कामाचे कौतुक करताना उपमुख्यमंत्री म्हणाले की, 'खासदार शिंदे यांच्याकडे विकासाचे व्हिजन आहे. ते नुसते रिझन (कारण) देत नाहीत, तर ऑन द स्पॉट डिसिजन घेतात. कामाची ही पद्धत चांगली आहे'.
'खड्डे खोदणारे खडड्यात गेले'
खासदार श्रीकांत शिंदे यांनी 2014 सालापूर्वीच्या आणि नंतरच्या कल्याण मतदारसंघातील विकास कामांमध्ये मोठा फरक असल्याचे स्पष्ट केले. विकासकामांमध्ये अनेकांनी अडथळे आणले, टीका केली आणि 'खड्डे खोदण्याचा प्रयत्न केला, पण तेच खड्ड्यात गेले', अशी सणसणीत टीका त्यांनी विरोधकांवर केली.
डोंबिवलीतील एका आजोबांच्या फोनवरून कचरा समस्येची माहिती मिळताच त्यांनी लगेच आयुक्तांना फोन करून ती सोडवण्यासाठी सांगितले. आधीचे खासदार रेल्वे आणि टेलिफोनपुरते मर्यादित होते, मात्र आपण सगळ्या समस्या सोडवण्यासाठी तत्पर असल्याचे खासदार शिंदे यांनी स्पष्ट केले.
भाजपा-शिंदे गट वादावर पडदा
केडीएमसी (KDMC) निवडणुकीच्या तोंडावर भाजप आणि शिंदे सेनेतील पक्ष प्रवेशावरून महायुतीमधील दोन्ही पक्षांमध्ये सुरू असलेल्या वादावर पडदा पडल्याचे यावेळी दिसून आले. भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी या कार्यक्रमात सहभाग घेतला.2014 च्या आधी एमएमआरडीएकडून कल्याण-डोंबिवलीला निधी मिळत नव्हता, मात्र शिंदे साहेबांसोबत आवाज उठविल्याने 2014 सालानंतर कल्याण-डोंबिवलीच्या विकासाला एमएमआरडीएकडून निधी मिळू लागला, अशी आठवण त्यांनी यावेळी सांगितली.