कल्याणमध्ये अशिलेश शुक्ला आणि त्याच्या पत्नीने मराठी कुटुंबावर हल्ला केल्याची घटना ताजी असतानात कल्याणमध्ये अशीच एक दुसरी घटना समोर आली आहे. कल्याणमध्ये पुन्हा एकदा परप्रांतीयाने मराठी माणसावर दादागिरी केल्याचा प्रकार समोर आला आहे. त्याने आधी चार वर्षाच्या मुलीशी अश्लील चाळे केले. त्याचा जाब विचारायला गेलेल्यावर मराठी पोलीस कर्मचाऱ्यासह त्यांच्या कुटुंबियांना मारहाण करण्यात आली आहे. उत्तम पांडे असे मारहाण करणाऱ्या परप्रांतीयाचे नाव आहे. या प्रकरणातही पांडे यांच्या पत्नीने देखील मारहाण केल्याचे समोर आले आहे. या मारहाणीचा सगळा प्रकार सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला आहे.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
परप्रांतीयांची मुजोरी थांबता थांबताना दिसत नाही. त्यांची ही दादागिरी पुन्हा एकदा कल्याणमध्ये पाहायला मिळत आहे. इथं एका चार वर्षाच्या मुलीशी अश्लील चाळे उत्तम पांडे याने केले. असा इथं राहाणाऱ्यांचा आरोप आहे. याबाबतचा जाब विचारण्यासाठी एक मराठी कुटुंब त्याच्याकडे गेलं होतं. मात्र जाब विचारायला गेलेल्या कुटुंबालाच पांडे याने फैलावर घेतलं. थेट त्याने मारहाण करायला सुरूवात केली. हे कमी होतं की काय या पांडेंच्या पत्नीने ही या मराठी कुटुंबाला मारलं.
या मारहाणीत मराठी पोलीस कर्मचारी जखमी झाला आहे. त्यांच्या पत्नी आणि आईला देखील मारहाण करण्यात आली आहे. जखमी तरुण हा पोलीस कर्मचारी आहे. ज्यावेळी मारहाण झाली त्यावेळची सर्व घटना सीसीटीव्हीत कैद झाली आहे. याबाबत मानपाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेनंतर परप्रांतीयांचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. या परप्रांतीयांची मुजोरी का वाढत आहे असा प्रश्नही या निमित्ताने उपस्थित होत आहे. याला चाप घातला पाहीजे अशी मागणीही आता पुढे येत आहे.
कल्याण पश्चिमेतील योगीधाम परिसरात अजमेरा हाईटस परिसरात मराठी कुटुंबाला मारहाण झाल्याची घटना ताजी आहे. या प्रकरणी सरकारी अधिकारी अखिलेश शुक्लाला अटक करण्यात आली होती. शिवाय त्याच्यावर निलंबनाची कारवाई ही करण्यात आली. या प्रकरणी त्याच्या पत्नीलाही अटक करण्यात आली आहे. या दोघांनाही सहा दिवसांची पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे. हे प्रकरण ताजे असताना असेच एक प्रकरण आता समोर आल्याने या परप्रांतीयांच्या मुजोरीची चर्चा कल्याणसह सगळीकडे रंगली आहे.