अमजद खान, प्रतिनिधी
कल्याण पश्चिमेतील योगीधाम परिसरात अजमेरा हाईटस परिसरात मराठी कुटुंबाला मारहाण करणारा निलंबित सरकारी अधिकारी अखिलेश शुक्लाला अटक करण्यात आली आहे. 'NDTV मराठी' नं या प्रकरणाची सर्वप्रथम वाचा फोडली होती. त्यानंतर त्याचे सर्वत्र जोरदार पडसाद उमटले. अखिलेशला तात्काळ निलंबित करण्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (CM Devendra Fadnavis) यांनी आज (शुक्रवार, 20 डिसेंबर) विधान परिषदेत केली.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
कुठे केली अटक?
अजमेरा सोसायटीत झालेल्या मारहाणीनंतर अखिलेश फरार होता. त्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला. त्यानंतर पोलिसांनी त्याच्या अटकेसाठी जोरदार मोहीम सुरु केली होती. तो टिटवाळा ते शहाड परिसरात लपून बसला असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानुसार पोलिसांनी कारवाई करत अखिलेशला अटक केली. या प्रकरणात जखमी अभिजित देशमुखांचा जबाब तसंच डॉक्टरांच्या रिपोर्टनुसार अखिलेशवरील कलमं वाढवण्यात येणार आहेत, अशी माहिती कल्याण डीसीपी अतुल झेंडे यांनी दिली. या प्रकरणातील अन्य दोन आरोपींना यापूर्वीच अटक करण्यात आली आहे.
( नक्की वाचा : मंत्रालयातील अधिकाऱ्याची मराठी माणसाला मारहाण, कल्याणमधील प्रकार! मनसेनं दिला गंभीर इशारा )
काय आहे प्रकरण?
कल्याण पश्चिमेतील योगीधाम परिसरात अजमेरा हाईटस ही इमारत आहे. या हाय प्रोफाईल इमारत अखिलेश शुक्ला राहतो. त्याच्या शेजारी अभिजीत देशमुख आणि विजय कल्वीकट्टे राहतात. बुधवारी रात्री शुक्ला याने घराबाहेर धूप लावला होता. त्याच्या धूराचा शेजाऱ्यांना त्रास होता. या त्रासामुळे शेजारी विजय कल्वीकट्टे याने शुक्ला याला जाब विचारला. त्यावरुन त्यांच्यात वाद झाला. या वादातून शुक्लाने बाहेरून दहा ते पंधरा जणांना बोलावले. त्यांनी सोसायटीतील लोकांना माराहाण केली. या मारहाणीमध्ये विजय कल्वीकट्टे, अभिजीत देशमुख, धीरज देशमुख हे तीन जण जखमी झाले.
कल्याणमध्ये परप्रांतीय व्यक्तीने मुजोरी करत मराठी माणसाला मारहाण केल्याने पडसाद सर्वत्र उमटले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देखील या प्रकरणाची दखल घेतली. अखिलेशविरुद्ध गुन्हा दाखल झाल्याची माहिती विधानपरिषदेत दिली. अखिलेश शुक्ला हा MTDC चा कर्मचारी आहे. याप्रकरणी पत्नीसह त्याच्यावर खडकपाडा पोलीस स्टेशनमध्ये FIR नोंद झाला आहे. त्याचं तत्काळ निलंबन देखील करण्याची कारवाई करण्यात आली आहे, असं मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केलं.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world