Kalyan News: कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेने थकबाकीदारांविरुद्ध आक्रमक पवित्रा घेतला असून वाधवा बिल्डरच्या बीओटी प्रकल्पावर मोठी जप्तीची कारवाई केली आहे. तब्बल 14 कोटी रुपयांचे भाडे थकवल्यामुळे पालिकेने या प्रकल्पांतर्गत येणारी प्रसिद्ध हॉटेल्स आणि बँक्वेट हॉल सील केले आहेत. ऐन लग्नसराईच्या काळात झालेल्या या कारवाईमुळे कार्यक्रमांचे आयोजक आणि व्यावसायिक मोठ्या संकटात सापडले असून परिसरात खळबळ उडाली आहे.
थकबाकीचा डोंगर आणि पालिकेचा बडगा
कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेच्या वाडेघर जलकेंद्र बीओटी प्रकल्पांतर्गत वाधवा बिल्डरला विविध व्यावसायिक जागा देण्यात आल्या होत्या. मात्र, गेल्या अनेक महिन्यांपासून या मालमत्तांचे मासिक भाडे पालिकेला मिळाले नव्हते.
थकबाकीचा आकडा 14 कोटी रुपयांच्या घरात गेल्याने पालिकेने वारंवार नोटिसा बजावल्या होत्या. सन 2023 मध्येच याबाबत पहिली नोटीस देण्यात आली होती आणि त्यानंतर प्रत्यक्ष पाहणीही करण्यात आली होती. तरीही विकासकाकडून प्रतिसाद न मिळाल्याने अखेर पालिकेच्या पथकाने धडक कारवाई करत या वास्तूंना टाळे ठोकले.
( नक्की वाचा : Vasai Crime: वसईच्या भोंदूबाबाची आरोपीच्या नवऱ्यासोबत झाली होती खास बैठक, वाचा नवं धक्कादायक वळण )
प्रसिद्ध हॉटेल्स आणि बँक्वेट हॉल सील
या कारवाईदरम्यान पालिकेने माधव बँक्वेट हॉल, नक्षत्र लॉन आणि प्रसिद्ध ग्रीन लीफ हॉटेल या ठिकाणांना सील केले आहे. अचानक झालेल्या या कारवाईमुळे येथील सुरू असलेले सर्व व्यावसायिक व्यवहार आणि नियोजित कार्यक्रम पूर्णपणे ठप्प झाले आहेत. पालिकेचे उपअभियंता जयवंत विश्वास यांनी स्पष्ट केले की, विकासकाला अनेक संधी देऊनही त्यांनी थकबाकी भरली नाही, त्यामुळे नियमांनुसार ही कठोर कारवाई करणे भाग पडले आहे.
लग्नसमारंभ ठप्प आणि आयोजकांची कोंडी
या कारवाईचा सर्वात मोठा फटका लग्नकार्य असलेल्या कुटुंबांना बसला आहे. माधव बँक्वेट हॉलचे व्यवस्थापन पाहणारे विनोद बारस्कर यांनी सांगितले की, उद्या एका लग्नाचा मोठा कार्यक्रम नियोजित असून त्यासाठी 500 पाहुणे येणार होते. मात्र, अचानक हॉल सील केल्यामुळे आयोजकांसमोर मोठे धर्मसंकट उभे राहिले आहे.
( नक्की वाचा : Pune News: जवानाच्या अपघाती मृत्यूचे गूढ उकलण्यात पोलिसांना अपयश; त्या 'दोन नोंदीं'नी वाढवला संताप )
व्यवस्थापनाचे म्हणणे आहे की, ते वाधवा बिल्डरला नियमित भाडे भरत आहेत, तरीही बिल्डर आणि पालिकेच्या वादात त्यांना विनाकारण फटका बसत आहे. ऐनवेळी कार्यक्रम कुठे न्यायचा, असा प्रश्न आता या कुटुंबांसमोर आहे.
केडीएमसीच्या या धडक कारवाईमुळे बीओटी तत्त्वावर चालणाऱ्या इतर प्रकल्पांचे धाबे दणाणले आहेत. सील केलेल्या मालमत्तांमध्ये आधीच बुकिंग केलेल्या ग्राहकांचे पैसे आणि नियोजित कार्यक्रमांचे काय होणार, याबाबत सध्या तरी अनिश्चितता आहे. विकासक तातडीने थकबाकी भरून हा प्रश्न सोडवणार की कायदेशीर लढाई सुरू होणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. तोपर्यंत मात्र व्यावसायिक आणि सर्वसामान्य नागरिकांना या गोंधळाचा त्रास सहन करावा लागणार आहे.