अमजद खान
कल्याणमध्ये रात्रीच्या वेळेस नशेखोरांचा हैदोस असतो. विनाकारण नागरीकांना मारहाण करणे, त्रास देणे, रस्त्यावर दारु पिणे सुरु असते. कल्याण डोंबिवलीत पोलिसांनी यांच्या विरोधात कारवाई केली होती. काही दिवस परिस्थिती सुधारल्याचे वाटत होते. परंतू पुन्हा एकदा कल्याण पूर्वेतील एका तलाावजवळ काही तरुण दारु पार्टी करीत असल्याचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. त्याचा तपास कोळसेवाडी पोलिसांनी सुरु केला आहे. अशा टोळक्यामुळे स्थानिकांच्या सुरक्षेचा प्रश्नही निर्माण होत आहे. त्यांना कुणी हटकले तर मोठा राडा होतो या आधीचा अनुभव आहे.
कल्याण डोंबवलीत रात्रीच्या वेळेस काही प्रमाणात नशेखोर हैदोस घालतात. काही दिवसापूर्वी कल्याण स्टेशनसमारे पान टपरी चालकाने सिगारेट पिण्यास माचिस दिली नाही, म्हणून हातात कोयता घेऊन दोन तरुणांनी दहशत माजविण्याचा प्रयत्न केला होता. या प्रकरणात कल्याणच्या महात्मा फुले पोलिसांनी दोन जणांच्या विरोधात कारवाई केली. या पूर्वी उपायुक्त अतुल झेंडे यांच्या नेतृत्वाखाली मुख्य चौकात आणि निसर्जनस्थळी कोम्बिंग ऑपरेशन करीत नशेखोर आणि गुंडाची धरपडक केली होती. पोलिसांनी अनेकांना अटक केली होती. सध्या पोलिसांची कारवाई सुरु असते.
मात्र कल्याणमध्ये एक व्हिडिओ सोशल मिडियावर वव्हायरल झाला आहे. हा व्हिडिओ कोळसेवाडीतील विठ्ठलवाडी स्मशानभूमीनजीकच्या तलावाचा आहे. त्याठिकाणी काही तरुण उघड्यावर दारु पार्टी करीत आहे. हा व्हीडिओ व्हायरल झाल्यावर कोळसेवाडी पोलिसांनी दारु पार्टी करणाऱ्यांचा शोध सुरु केला. या प्रकरणी काेळसेवाडी पोलिसांनी गंभीर दखल घेत दारु पार्टी करणाऱ्या चौघांचा माज उतरवला आहे. या चौघांनाही पोलिसांनी ताब्यात घेऊन कारवाई केली आहे. अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे अंजप्पा शाखापनुर (३०) , विल्सन आवलर (३०) , शैलेंद्र सकपाळ (३६) आणि उमेश साेळंकी ( ४८) अशी आहेत. अटक आरोपींपैकी विल्सन हा बिगारी काम करतो. उर्वरीत तिघेही रिक्षा चालवतात. हे चौघेही कल्याण पूर्व परिसरात राहतात. रात्रीच्या सुमारास रिक्षा स्टॅन्ड नजीक तलाव आहे. या तलावाशेजारी बसून भर रस्त्यात ते दारु पार्टी करीत होते.