अमजद खान
उत्तर भारतीयांचा श्रावण महिना सुरू झाला आहे. त्यामुळे ते या काळात शंकराची किंवा शिवलिंगाची पुजा करतात. मात्र या पुजेवरूनच दोन कुटुंबात जोरदार राडा झाला आहे. हा राडा कल्याणजवळील आंबिवली परिसरात झाला आहे. या प्रकरणी दोन्ही पक्षांनी कल्याणच्या खडकपाडा पोलीस ठाण्यात एकमेकांविरोधात तक्रारी दाखल केल्या आहेत. पोलिसांनी या प्रकरणी पुढील तपास सुरू केला आहे. यात महिलांना मारहाण केल्याचा आरोप तक्रारीत करण्यात आला आहे. शिवाय एका महिलेला तुला विधवा करेन अशी धमकी ही देण्यात आली आहे.
आंबिवली येथील गणेश पाटील नगर परिसरात आशा शर्मा या राहतात. त्यांनी शिवलिंग स्थापना आणि भंडाऱ्याचे आयोजन केले होते. यावेळी त्याच इमारतीत राहणाऱ्या एका कुटुंबा सोबत त्यांचा वाद झाला. आशा शर्मा यांनी आपल्या पुजेत संबंधीत कुटुंबाने अडथळा आणल्याचा आरोप केला आहे. ही पुजा आपण आपल्या जागेत मांडली होती. तरी ही भंग करण्यात आल्याचं ही त्यांनी आपल्या तक्रारीत म्हटलं आहे. ऐवढचं नाही तर आपल्यावर हल्ला केल्याचा आरोपही आशा शर्मा यांनी केली आहे. मारहाण करण्याच पुरूष ही पुढे होते असं ही त्यांनी सांगितलं.
हा वाद वाढत गेला. त्यामुळे तो सोडवण्यासाठी काही शेजारी महिलांनी हस्तक्षेप केला. मात्र त्यांना ही मारहाण झाल्याचा त्यांचा आरोप आहे. ज्या ठिकाणी शिवलिंग स्थापना आणि पूजेचा कार्यक्रम सुरू होता, त्या जागेशी संबंधीत मारहाण करणाऱ्या कुटुंबाचा काही संबंध नव्हता. तरी ही त्यांनी वाद निर्माण केला असं आशा शर्मा यांनी सांगितलं. दुसरीकडे, या प्रकरणात मारहाण केलेल्या कुटुंबाने कोणतीच प्रतिक्रीया दिलेली नाही. मात्र त्यांनी आशा शर्मा यांच्या विरोधात तक्रार दाखल केली आहे. खडकपाडा पोलिसांनी या प्रकरणी परस्पर विरोधी तक्रारी दाखल करून घेतल्या आहेत.
हा वाद दोन कुटुंबातील असल्याचं पोलिसांनी सांगितलं आहे. दोन्ही बाजूंनी एकमेकांविरोधात तक्रारी दिल्या आहेत. दोन्ही पक्षांचे आरोप नोंदविण्यात आले आहेत. त्यानुसार प्रकरणाचा पुढील तपास सुरू आहे असं पोलिसांनी स्पष्ट केलं आहे. कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेच्या काँग्रेस गटनेत्या कांचन कुलकर्णी यांनी घटनास्थळी भेट दिली होती. त्या म्हणाल्या की धार्मिक विषयावर मी भाष्य करणार नाही. मात्र, महिलांना मारहाण झाली असेल तर संबंधितांवर कठोर कारवाई झाली पाहिजे, अशी मागणी त्यांनी केली आहे.