अमजद खान
भाजपचे माजी आमदार गणपत गायकवाड यांची निर्दोष मुक्तता करण्यात आली आहे. 2014 साली विधानसभा निवडणूक नुकतीच संपली होती. कल्याण पूर्वचे माजी आमदार गणपत गायकवाड हे अपक्ष आमदार म्हणून निवडून आले होते. तर राष्ट्रवादीकडून निलेश शिंदे यांनी विधानसभेची निवडणूक लढवली होती. वेगवेगळ्या कारणासाठी गायकवाड आणि शिंदे हे दोघे एकाच वेळी कोळसेवाडी पोलिस ठाण्यात आले होते. एका कारणावरुन दोघांमध्ये पोलिस ठाण्यात वरिष्ठ पोलिस निरिक्षकांसमोरच राडा झाला. त्याबाबत पोलिसांनी गुन्हा दाखल केला. 11 वर्ष ही केस कल्याण जिल्हा सत्र न्यायालयात सुरु होती. या प्रकरणात माजी आमदार गायकवाड आणि शिंदे यांच्यासह पाच जणांची निर्दोष मुक्तता करण्यात आली आहे.
2014 साली विधानसभा निवडणूकीनंतर कल्याण पूर्वेत गुन्हेगारी वाढली होती. राष्ट्रवादीकडून गुन्हेगारीवर अंकूश लावण्याकरीता एक विशाल मोर्चा काढण्यात आला होता. या मोर्चेचे नेतृत्व निलेश शिंदे यांनी केले होते. शिंदे या मोर्चाचे शिष्टमंडळ घेऊन कोळसेवाडी पोलिस ठाण्यातील वरिष्ठ पोलिस निरिक्षकांच्या केबीननमध्ये गेले होते. याच दरम्यान आमदार गायकवाड हे देखील एका केबल व्यावसायिकाच्या प्रकरणात पोलिस ठाण्यात गेले होते.
याचवेळी आमदार गायकवाड आणि शिंदे समर्थकांमध्ये वाद झाला. या प्रकरणी कोळसेवाडी पोलिसांनी तत्कालीन आमदार गणपत गायकवाड आणि शिंदे यांच्यासह काही जणां विरोधात गुन्हा दाखल केला होता. गायकवाड यांचे पुतणे कुणाल पाटील त्यांचे समर्थक विक्की गणात्रा यांनी वरिष्ठ पोलिस निरिक्षकांच्या केबीनमध्येच राडा केला होता. त्या विरोधात हा गुन्हा दाखल झाला. प्रकरण कोर्टात गेले होते. जवळपास 11 वर्षे हा खटला कल्याण न्यायालयात सुरु होता. 2014 सालच्या निवडणूकीत राजकीय समीकरणे बदलली.
त्यावेळी निलेश शिंदे यांनी गायकवाड यांच्या विरोधात निवडणूक लढविली होती. 2024 साली निलेश शिंदे हे शिवसेना शिंदे गटाचे शहर प्रमुखपदी होते. पुढे त्यांनीच आमदार गायकवाड यांच्या पत्नी सुलभा यांना निवडून आणण्यासाठी काम केले. आत्ता 11 वर्षानंतर कोळसेवाडी राडा प्रकरणाचा निकाल आला आहे. या प्रकरणात सर्व पाचही आरोपींना निर्दोष मुक्तता केली आहे, अशी माहिती वकिल गणेश घोलप यांनी दिली आहे. सध्या गायकवाड हे पुतण्या कुणाल पाटीलसह हिललाईन पोलिस ठाण्यातील गोळीबार प्रकरणात तळोजा जेलमध्ये आहेत.