- रॅपिडोवर कल्याण उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाने नियमांचे उल्लंघन केल्यामुळे मोठी कारवाई केली आहे
- रॅपिडोच्या दुचाकी टॅक्सी चालकांवर गुन्हा दाखल करून दंडात्मक कारवाईत सुमारे एक लाख पन्नास हजार रुपये वसूल झाले
- महाराष्ट्रात दुचाकीवरून व्यावसायिक प्रवासी सेवा देण्यास परवानगी नाही, त्यामुळे रॅपिडोवर कारवाई.
अमजद खान
लोकांच्या सेवेसाठी टॅक्सी,रिक्षा, ओला- उबर या कंपन्या सेवा देत आहे. त्यात आता रॅपिडोचीही भर पडली आहे. रॅपिडो आपल्या टुव्हीलर सेवेसाठी कमी वेळात जास्त फेमस झाली आहे. पण याच रॅपिडोला कल्याण उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाने (RTO) जबर दणका दिला आहे. नियमाचे उल्लंघन केल्याचे कारण देत कल्याण आरटीओने 'रॅपिडो' (Rapido) बाईक टॅक्सी सेवेवर मोठी कारवाई केली आहे. ही कारवाई मोठ्या प्रमाणात करण्यात आल्याने रॅपिडोमध्ये एकच खळबळ उडाली आहे.
कुठलीही प्रवासी वाहतूक करण्यासाठी आवश्यक असलेली कायदेशीर परवानगी घ्यावी लागते. ही परवानगी न घेता जर कोणी प्रवासी वाहतूक करत असेल तर तो गुन्हा ठरतो. हीच चुक रॅपिडोने केली. त्यामुळे दुचाकीवरून सेवा देणाऱ्या रॅपिडो संचालकांविरोधात महात्मा फुले पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गेल्या काही वर्षांत चारचाकी वाहनांबरोबरच दुचाकीद्वारे प्रवासी वाहतूक करणाऱ्या कंपन्या बाजारात उतरल्या आहेत.
नक्की वाचा - Viral Video: ट्रेनमध्ये होतेय दारूची खुलेआम विक्री, गुटखा, पानमसाला सोबत मिळतय बरच काही
मात्र, महाराष्ट्रात दुचाकीवरून व्यावसायिक प्रवासी सेवा देण्यास कायद्याने परवानगी दिलेली नाही. परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांच्या निर्देशानुसार, कल्याण आरटीओ कार्यालयाने नाकाबंदी करत रॅपिडोच्या दुचाकींचा शोध घेतला. त्यात 47 चालकांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली. शिवाय त्यांच्याकडून सुमारे 1.5 लाख रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे. रॅपीडोसाठी हा मोठा दणका मानावा लागेल.
याबाबत परिवहन अधिकारी आशुतोष बारकूल यांनी या कारवाईची माहिती दिली. या चालकांकडून तात्पुरते वाहन परवाने घेऊन 'ऍग्रीगेटर इलेक्ट्रिक बाईक टॅक्सी पॉलिसी'चे उल्लंघन केले जात होते. त्यामुळे प्रवाशांच्या जीवाला धोका निर्माण होत होता, असे आरटीओच्या निदर्शनास आले. आरटीओने कठोर भूमिका घेत बेकायदेशीर सेवेसाठी थेट रॅपिडो संचालकांविरोधातच पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. शासनाकडून कोणत्याही ऍग्रीगेटर धारकांना दुचाकीद्वारे प्रवासी सेवा पुरवण्यास परवानगी नसल्यामुळे, नागरिकांनी ऑनलाईन ॲप्सच्या माध्यमातून दुचाकीवरून प्रवास करणे टाळावे, असे आवाहन बारकूल यांनी केले आहे.