अमजद खान
कल्याण-कल्याण डोंबिवली महापालिका हद्दीत रस्त्यावरील वाहतूक कोंडीने रस्ते जाम होत आहेत. या वाहतूक कोंडीने नागरीकांसह, प्रवासी, वाहन चालकांना त्रास सहन करावा लागला. वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी वाहतूक नियोजनाचा अभाव आहे. रस्त्यावर पडलेले खड्डे आणि मेट्रोचे सुरु असलेले काम ही वाहतूक कोंडी होण्यासाठी प्रमुख कारणे आहे. त्यावर ठोस उपाययोजना केल्या जात नाहीत, तोपर्यंत या वाहतूक कोंडीतून सुटका होणे अशक्य आहे असचं म्हणावं लागेल. कल्याण डोंबिवलीतील नागरीकांना सतत वाहतूक कोंडीचा सामना करावा लागत आहे.
कल्याण पश्चिमेतील सहजानंद चौक, लाच चौकी, छत्रपती शिवाजी महाराज चौक, एपीएमसी मार्केट या भागात गुरुवारी ही वाहतूक कोंडी पाहावयास मिळाली. त्याचबरोबर कल्याण शीळ रस्त्यावर वाहतूक कोंडी होती. कल्याण पूर्वेतील चक्कीनाका, नेतिवली नाका, मलंग रोड, पूना लिंक रोड यावरही वाहतूक कोंडी होती. या वाहतूक कोंडीत अनेक वाहने अडकून पडली होती. पावसामुळे रस्त्यावर पडलेले खड्डे हे वाहतूक कोंडी होण्यास प्रमुख कारण आहे. हे खड्डे पावसाळ्यात बुजवले नाहीत. त्याचा हा परिणाम म्हणता येईल.
पावसाने उघडीप घेतल्यावर खड्डे बुजविले जातील असे महापालिका प्रशासनाकडून सांगण्यात आले होते. आत्ता कुठे रस्त्यावरील खड्डे बुजविण्यास सुरुवात झाली आहे. खड्डे बुजविण्याचे काम भर दिवसा सुरु असल्याने त्यामुळेही वाहतूकीस अडथळा होत आहे. या शिवाय कल्याण तळोजा मेट्रो रेल्वे आणि कल्याण भिवंडी ठाणे मेट्रो रेल्वेचे काम कल्याण स्टेशन परिसरात सुरु आहे. त्यामुळे कल्याण शीळ रत्यावर वाहतूक कोंडी होत आहे. त्याचबरोबर कल्याण स्मार्ट सिटी प्रकल्पांतर्गत स्टेशन परिसर विकासाचे काम सुरु आहेत. त्यामुळे स्टेशन परिसरात वाहतूक कोंडी होते.
सण उत्सावात वाहतूकीत बदल केला जातो. तसेच विकास कामे सुरु आहेत. काही ठिकाणी रस्त्याची, पूलाची देखभाल करण्याच्या कामाकरीताही वाहतूकीत बदल केला जातो. वाहतूकीतील बदल हा वाहतूक सुरळित करण्यासाठी केला जात असला तरी त्यामुळे देखील वाहतूक कोंडीत भरचच पडत आहे. या वाहतूक कोंडीत रुग्णवाहिका, शाळेच्या बसेस अडकून पडतात. तसेच अनेक चाकरमान्यांना बसने प्रवास करताना त्यांच्या कार्यालयात वेळेवर पोहचता येत नाही. या वाहतूक कोंडीमुळे नागरीक, वाहनचालक हैराण झाले आहे. वाहतूक कोंडी सोठविण्यासाठी वाहतूक नियोजनाचा अभाव असल्याने त्याचा मनस्ताप सगळ्यांनाच सहन करावा लागतो.