अमजद खान
कल्याण तळोजा मेट्रोसाठी पिलर उभारण्याचे काम कल्याण शिळ मार्गावर सुरु आहे. रविवारी काम सुरु असताना डीएनएस बँकेजवळ काँक्रीटच्या पिलरची उंची वाढविण्यासाठी उभारली जाणारी लोखंडी कमान अचानक झुकल्याने घबराट पसरली. घटनेचे गांभीर्य ओळखून वाहतूक पोलिसाच्या मदतीने दोन्ही बाजूची वाहतूक रोखून पिलरवर काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना क्रेनच्या मदतीने खाली उतरविण्यात आले. दरम्यान झुकलेल्या पिलरला तीन क्रेनच्या मदतीने आधार देत या संपूर्ण खांबाची तपासणी तज्ञाकडून केली जात आहे.
कल्याण तळोजा मेट्रोच्या पिलरचे काम सुरु आहे. आज सकाळपासून कंत्राटदाराचे कामगार डीएनएस बँकेजवळील पिलर नंबर 145 चे काम करत होते. हा खांब निम्म्याहून अधिक काँक्रीटने तयार करण्यात आला आहे. उर्वरित पिलरसाठी लोखंडी कमान बांधण्याचे काम सुरु होते. त्याच वेळी अचानक ही लोखंडी कमान एका बाजूला झुकू लागल्याचे लक्षात आले. कामगारांनी आरडा ओरडा सुरू केला. यानंतर तातडीने कामगारांना उतरवत झुकलेल्या लोखंडी कमानीला तीन क्रेनच्या मदतीने टेकू देण्यात आला.
या पिलरच्या संपूर्ण कामाची तपासणी देखील सुरु करण्यात आली आहे. टेकू दिल्यानंतर काही वेळाने वाहतूक सुरु करण्यात आली. पण त्यामुळे आधीच्या कोंडीने ग्रासलेल्या कल्याण शिळ मार्गावरील कोंडीत भर पडली आहे. मात्र हा खांब झुकल्याने मेट्रोच्या सर्वच कामाबाबत संभ्रम निर्माण झाला आहे. एकीकडे मेट्रोचे काम त्यात हा झालेला प्रकार यामुळे मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी झाली होती. नागरिकांना त्याचा नाहक त्रास सहन करावा लागला. कल्याण डोंबिवलीतील जनतेला वाहतूक कोंडीने आधीच त्रस्त झाली आहे.