अमजद खान
कल्याणमधील अर्णव खैरे या तरुणाचा आत्महत्ये प्रकरणात आता राजकीय प्रतिक्रिया उमटू लागल्या आहेत. भाजप आणि शिवेसना शिंदे गटाच्या पदाधिकाऱ्यांनी पिडीत कुटुंबांची भेट घेतली आहे. भाषा वादामुळे अशी दुर्दैवी घटना घडली आहे, असे भाजपचे म्हणणे आहे. तर राजकारण न करता अर्णवच्या कुटुंबियांना न्याय कसा मिळेल यासाठी सर्वांनी प्रयत्न केला पाहिजे अशी प्रतिक्रिया शिंदे गटाने व्यक्त केली आहे. तर भाजच हा गलीच्छ राजकारण करते. सरकार तुमचे आहे. आत्तापर्यंत गुन्हा का दाखल नाही ? अशी टिका मनसेने केली आहे. त्यामुळे भाषावादावरून आता तिन पक्ष एकमेकांना भिडले आहे.
अर्णव खैरे हा तरुणी कल्याणचा राहाणारा होता. त्याने मंगळवारी घरी गळफास घेऊन आत्महत्या केली. तो मुलुंड येथील केळकर कॉलेजला शिकत होता. मंगळवारी तो कल्याणहून रेल्वेने मुलुंडला निघाला होता. गाडीला गर्दी होती. गर्दीत त्याने त्याच्या पुढे असलेल्या प्रवाशांना आगे सरको असे म्हणाला. या कारणावरुन अर्णव याला चार जणांनी दम दिला. मराठी बोलण्यास लाज वाटते का? असे बोलून अर्णवला मारहाण केली. या घटनेचा जबर मानसिक धक्का अर्णवला बसला.
तो मुलुंड न जाता ठाण्याला उतरुन घरी परतला. त्याने घरी येऊन गळफास घेतला. या घटनेवर भाजपचे मुंबई प्रदेशाध्यक्ष अमित साटम यांनी ट्वीट केले. अर्णव याचा फोटो ट्वीट करीत ठाकरे बंधूवर टिका केली आहे. हे पाप कुठे फेडणार? असे म्हटले आहे. त्यानंतर या घटनेवरुन राजकारण तापले आहे. शुक्रवारी शिवसेना शिंदे गटाचे शहर प्रमुख निलेश शिंदे यांनी खैरे कुटुंबियांची भेट घेतली. खासदार श्रीकांत शिंदे यांनी फोनवरुन खैरे कुटुंबियांशी संवाद साधला. अर्णव आत्महत्या प्रकरणाची सखोल चौकशी करण्यात यावी असे पोलिसांना सांगितले आहे असं त्यांनी खैरे कुटुंबाला सांगितलं.
भाजपचे पदाधिकारी नरेंद्र सूर्यवंशी यांनी देखील खैरे कुटुंबियांची भेट घेतली. ही घटना अत्यंत दुर्दैवी आहे. अर्णव याला मारहाण करणारे मराठीच होते. भाषिक वादामुळे अशा दुर्दैवी घटना घडतात. ही वस्तूस्थिती आहे. मनसेचे जिल्हाध्यक्ष उल्हास भोईर यांनी अर्णवने आत्महत्या केली. ही घटना दुर्दैवी आहे. त्याला प्रवासात मारहाण झाली. या घटनेचा आम्ही निषेध करतो. भाजप नेहमीच गलीच्छ राजकारण करते. सरकार तुमचे आहे. तर या प्रकरणात अद्याप गुन्हा का दाखल झाला नाही ? असा संतप्त सवाल मनसेच्या वतीने उपस्थित करण्यात आला आहे. अर्णव आत्महत्या प्रकरणातील आरोपींना त्वरीत अटक करा अशी मागणी देखील मनसेने केली आहे.