अमजद खान
कल्याणमध्ये एका महिला रुग्णाला दिलेल्या औषधी गोळ्यांत आळ्या सापडल्या आहेत. ही बाब समोर येताच महिलेला गोळ्या देणाऱ्या डॉक्टरांना ही धक्का बसला आहे. सायली पनवेलकर यांचा खांदा दुखत होता. त्यावर त्यांनी कल्याणमधील डॉक्टर केदार भिडे यांच्याकडे उपचार घेतले. डॉक्टरांनी त्याला गोळ्या दिल्या होत्या. पण त्याच गोळ्यांमध्ये आळ्या सापडल्या आहेत. डॉक्टर केदार भिडे यांनाही या गोळ्या पाहून धक्का बसला. या प्रकरणी गोळ्या पुरवठा करणाऱ्या एजेन्सीला कळविण्यात आले आहे. या प्रकरणी कंपनीने योग्य दखल घेतली नाही तर ग्राहक न्यायालयात दाद मागणार असल्याचे डॉक्टर भिडे यांनी सांगितले आहे. ही बाबत समोर आल्यानंतर सर्वांनीच आश्चर्य व्यक्त केले आहे.
कल्याण पश्चिमेतील प्रथमेश इमारती राहणाऱ्या सायली पनवेलकर यांचा खांदा दुखत होता. त्यांची मुलगी मानसी राणे या त्यांच्या आई सायली यांना डॉक्टर केदार यांच्याकडे उपचारासाठी घेवून गेल्या. डॉक्टरांनी त्यांना गोळ्या दिल्या. त्या गोळ्यामध्ये ऍसिडिटीवर ओमे कैप-20 ही गोळी देखील होती. सायली यांनी गोळ्या खाण्यासाठी घेतल्या. तेव्हा त्या गोळ्या काळपट असल्याचे दिसून आले. त्यांना थोडं वेगळं वाटलं. गोळ्या अशा का असा त्यांना संशय आला.
त्यांनी त्या गोळ्या निरखून पाहिल्या. त्यावेळी त्यांना त्या गोळ्यात आळ्या दिसून आल्या. हे पाहून सायली आणि त्यांची मुलगी मानसी यांना धक्का बसला. गोळ्यांच्याीपाकिटावर गोळ्यांची मॅन्युफॅक्चर डेट ही 2025 सालची होती. त्या गोळ्यांची मुदत 2027 साल पर्यंत असल्याचं ही त्यावर नमूद करण्यात आलं होतं. मुदत संपलेली नसताना गोळ्या काळपट आणि त्यात आळ्या कशा काय आढळून आल्या असा प्रश्न त्यांना पडला. हा प्रकार एखाद्या रुग्णांच्या जिविताशी खेळण्याचा आहे. त्यामुळे गोळ्यांच्या कंपनी विरोधात कारवाई झाली पाहिजे अशी मागणी सायली यांची मुलगी मानसी यांनी केली आहे.
नक्की वाचा - Kalyan News: भाषा वादात अर्णवचा बळी, पण राजकारण्यांची भलतीच खेळी, वाद चिघळणार?
मानसी यांनी आईसोबत डॉक्टर भिडे यांच्याकडे धाव घेतली. हा प्रकार ऐकताच डॉक्टर भिडे यांनाही धक्का बसला. असा प्रकार अन्य कोणा सोबत होऊ नये. यासाठी डॉक्टर भिडे यांनी तातडीने प्राईड हेल्थ केअरशी संपर्क साधला. त्यांना घडला प्रकार सांगितला. त्यांना या बाबत पूर्ण कल्पना दिली. या प्रकरणी गोळ्यांची कंपनी रोनपोली यांच्याकडे संपर्क साधून घडला प्रकार त्यांच्या निदर्शनास आणला. त्यांना आळ्या आढळून आलेल्या गोळ्या पाठवून द्या. कंपनीने दाद दिली नाही तर या प्रकरणात ग्राहक न्यायालयाकडे दाद मागण्यात येईल असे डॉक्टर भिडे यांनी सांगितले.