- गुरुवारी रात्री कल्याण पश्चिम येथील निकी नगर परिसरात दोन तरुणी आणि एक तरुण दारू पार्टी करत भांडण करत होते
- या दारूच्या नशेत तिघांनी भर रस्त्यात शिवीगाळ करत धिंगाणा घातला आणि काहींनी त्यांचा व्हिडीओ काढला
- व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला असून त्यानंतर खडकपाडा पोलिसांनी तिघांविरोधात त्वरित कारवाई केली
अमजद खान
दोन तरुणी आणि एक तरुण या तिघांनी गुरुवारी रात्री दारू पार्टी केली. मात्र दारू पार्टी दरम्यान तरुणींमध्ये वाद झाला. या वादानंतर भर रस्त्यात तिघांनी धिंगाणा घातला. विशेष म्हणजे सर्वांसमोर खुलेआम हा धिंगाणा सुरू होता. त्यावेळी काहींनी त्यांचा व्हिडीओ काढला. तो सोशल मीडियावर टाकला. त्यानंतर तो बघता बघता जोरदार व्हायरल झाला. हा व्हिडीओ अखेर खडकपाडा पोलीसांपर्यंत पोहोचला. त्यानंतर खडकपाडा पोलीसांनी या तिघांवर कारवाईचा बडगा उगारला. सध्या या व्हिडीओची जोरदार चर्चा कल्याण डोंबिवलीत होत आहे.
कल्याण पश्चिम येथील निकी नगर परिसरात भर रस्त्यात दोन तरुणी भांडण करत होत्या. ही भांडणं भयंकर स्वरूपाची होती. त्या दोघी एकमेकांना शिवीगाळ करत होत्या. त्यांच्या सोबत एक तरुण ही होता. त्या दोघी त्या तरुणालाही शिवीगाळ करत होत्या. या तिघांचा ही धिंगाणा भर रस्त्यात सुरू होता. काही जणांनी यांच्यातील वाद सोडवण्याचा प्रयत्न केला. काहींनी त्यांची समजूत काढण्याचा ही प्रयत्न केला. पण तिघे ही दारूच्या नशेत होते. ते कोणाचेही ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हते. काही दक्ष नागरिकांनी या घटनेची माहिती कल्याणच्या खडकपाडा पोलिसांना दिली. त्यानंतर पोलीस त्वरित घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी देखील समजूत काढायच्या प्रयत्न केला.
मात्र तरुणी पोलिसांसमोरच समजूत काढणाऱ्या लोकांना शिवीगाळ करत होत्या. त्यावेळी त्यांचा व्हिडीओ काही जणांनी काढला. हा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला. कल्याणच्या खडकपाडा पोलिसांनी या तिघां विरोधात कारवाई केली आहे. यातील एका तरुणाने घडलेल्या प्रकारा बद्दल व्हिडिओ द्वारे माफी देखील मागितली आहे. हे तिघे कॉलेज विद्यार्थी आहेत. नामांकित महाविद्यालयमध्ये ते शिक्षण घेत आहेत. गुरुवारी रात्री तिघांनी पार्टी केली. मात्र या पार्टीदरम्यान दोन तरुणींमध्ये दारूच्या नशेत भांडण झाले. या भांडणानंतर भर रस्त्यात धिंगाणा घातला होता.