अमजद खान, प्रतिनिधी
Kalyan News: वडिलांचा पाणीपुरीचा व्यवसाय. त्यानं लॉकडाऊनमध्ये परीक्षा दिली. त्यावेळी तो अकरावीमध्ये नापास झाला. पण, तरीही तो हिंमत हरला नाही. आयआयटीमधून शिक्षण घेण्याचे स्वप्न होते. घरतील परिस्थिती हालाखीची होती. त्यात त्याची प्रकृतीही साथ देत नव्हती. मात्र इच्छा असेल तर काहीही शक्य होतं. हे कल्याणच्या हर्ष गुप्ता या तरुणाने दाखवून दिले आहे. ११ वी नापास झाल्यावर त्याने असा अभ्यास केला की त्याला आज रुरकी आयआयटीमध्ये प्रवेश मिळाला आहे. पाणीपुरीवाल्याचा मुलगा आयआयटीयन कसा होणार? असं त्याला हिणवणारी लोकंच आज त्याचं अभिनंदन करत आहेत.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
अकरावी नापास ते आयआयटी!
कल्याण पूर्वेतील चिंचपाडा परिसरात राहणारा हर्ष गुप्ता हा विद्यार्थी 11 वीची परीक्षा नापास झाला होता. त्याने जिद्द सोडली नाही. त्याने अकरावीची परीक्षा पुन्हा दिली. तो पास झाला. त्यानंतर बारावीची परीक्षा दिली. त्याला JEE मेन्समध्ये 98.59 टक्के मार्क्स मिळाले. तो JEE ॲडव्हान्ससाठी पात्र झाला. पण, देशातील टॉप कॉलेजमध्ये प्रवेश घ्यायचा असल्यानं त्यानं अभ्यास सुरुच ठेवला.
या ध्येय गाठण्यासाठी त्यानं राजस्थान गाठलं. तिथं जाऊन अभ्यास केला. अखेर त्याची आयआयटी रुरकीमध्ये निवड झाली आहे.
( नक्की वाचा: विदर्भातल्या शेतकऱ्याचा मुलगा JEE मेन्समध्ये देशात पहिला, जाणून घ्या यशाचं गुपित )
चिडवणारे अभिनंदन करु लागले
हर्षचे वडील पाणीपुरी विक्रेते आहेत. पण, आपल्या मुलानं उच्च शिक्षण घ्यावं असं त्यांचं ध्येय होता. घरातून पाठिंबा असला तरी बाहेर हर्षचा संघर्ष सुरुच होता. पाणीपुरीवाल्याचा मुलगा आयआयटीमध्ये कसा जाणार? असं वर्गातील मुलं त्याला चिडवत असंत. त्यानंतरही हर्षनं जिद्द सोडली नाही.
हर्षनं मुलांच्या चिडवण्याकडं दुर्लक्ष केलं. त्यानं त्याच्या ध्येयावर लक्ष केंद्रीत केले हर्षची आई गावी असते. हर्ष त्याचे वडिल, दोन भाऊ आणि आजीसोबत राहतो. त्याने अभ्यासासाठी एकांत मिळावा यासाठी दहा बाय दहाची रुम भाड्याने घेतली. रोज 10 ते 12 तास अभ्यास करत आयआयटी प्रवेशाचं लक्ष्य गाठलं.
मुलांचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी जीवाची बाजी!
हर्षचे वडील संतोष गुप्ता यांनी सांगितलं की, मी पाणीपुरी विक्रेता असलो तरी मुलांची स्वप्ने पूर्ण करण्यासाठी जीवाची बाजी लावू शकतो. पाणीपुरी विक्रीतून मिळणारे उत्पन्म फारसे नाही. तरीही मी एलआयसी, जमा ठेवी या मोडित काढून हर्षच्या शिक्षणासाठी पैसा उभा केला. हर्षची आयआयटीत निवड झाली. त्याचा आनंद खूप आहे. हर्षप्रमाणे शुभम आणि शिवम या मुलांनाही उच्च शिक्षण देऊन मोठं करण्याचं माझं ध्येय आहे.