Kalyan News : कल्याण ग्रामीण परिसरातील देसाई खाडी सध्या प्रदूषणाच्या विळख्यात सापडली असून खाडीच्या पाण्यावर सर्वत्र जलपर्णीचे साम्राज्य पसरले आहे. यामुळे खाडीतील जैवविविधता पूर्णपणे धोक्यात आली असून स्थानिक नागरिकांमध्ये संतापाचे वातावरण आहे. आजूबाजूच्या गृहसंकुलांमधून कोणत्याही प्रक्रियेविना सोडले जाणारे सांडपाणी या परिस्थितीला मुख्यत्वे जबाबदार असल्याचे समोर आले आहे. या गंभीर प्रकरणाची दखल घेत प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या अधिकाऱ्यांनी परिसराची पाहणी केली असून दोषींवर कायदेशीर कारवाई करण्याचे आश्वासन दिले आहे.
नद्यांचे रूपांतर नाल्यांत; मोथली आणि वालधूनीची दुरवस्था
कल्याण नजीकच्या मलंग गड परिसरातून वालधूनी आणि मोथली या दोन नद्या उगम पावतात. वालधूनी नदी ही महाराष्ट्रातील सर्वात प्रदूषित नदी म्हणून ओळखली जाते, जिचे आता नाल्यात रूपांतर झाले आहे. अशीच काहीशी स्थिती मोथली नदीचीही झाली आहे.
शिरडोण, वडवली आणि न्हारेन मार्गे वाहत येणारी मोथली नदी देसाई खाडीला येऊन मिळते. या संपूर्ण प्रवासात नदीपात्रात प्रक्रिया न केलेले सांडपाणी थेट सोडले जात असल्याने नदी पूर्णपणे प्रदूषित झाली आहे. नदीपात्रापासून ते खाडीपर्यंत सर्वत्र जलपर्णी पसरल्याने पाण्याचा नैसर्गिक प्रवाह आणि जलचर संकटात आले आहेत.
( नक्की वाचा : Dombivli News: नवऱ्यानं आधी घरातील सिलेंडर लांबवला, आता पत्नीला सांगतोय ‘धंदा कर'; डोंबिवलीतील संतापजनक प्रकार )
मोठ्या गृहसंकुलांकडून नियमांचे उल्लंघन
देसाई खाडी परिसरातील मोठ्या गृहसंकुलांमधून सांडपाणी प्रक्रिया न करता थेट खाडीपात्रात सोडले जात असल्याचा गंभीर आरोप स्थानिक जागरूक नागरिक महेंद्र पाटील यांनी केला आहे. या भागात मोठ्या प्रमाणावर नागरीकरण झाले असून गृहसंकुलांमधील सांडपाणी व्यवस्थापन कोलमडल्याचे चित्र दिसत आहे. या संदर्भात राज्य सरकारच्या पर्यावरण विभागाकडे अधिकृत तक्रार करणार असल्याचेही पाटील यांनी सांगितले. यापूर्वी अनेक पर्यावरण प्रेमींनी तक्रारी करूनही सरकारी यंत्रणांनी याकडे दुर्लक्ष केल्याची खंत व्यक्त केली.
या प्रकरणाची माहिती मिळताच कल्याण प्रदूषण नियंत्रण मंडळाचे अधिकारी उपेंद्र कुलकर्णी यांच्या पथकाने देसाई खाडी परिसराची पाहणी केली. प्राप्त झालेल्या तक्रारींच्या आधारावर सध्या सखोल चौकशी केली जात आहे. कुलकर्णी यांनी सांगितले की, पाहणी दरम्यान प्रदूषणाची तीव्रता लक्षात आली असून या प्रकरणात जे कोणी दोषी आढळतील त्यांच्यावर कडक कायदेशीर कारवाई केली जाईल
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world