Kalyan Shil Road Closure March 2026 : कल्याण ते तळोजा दरम्यानच्या मेट्रो लाईन 12 प्रकल्पाचं काम सध्या वेगानं सुरु आहे. या मार्गावर मेट्रोचे अवजड सिमेंट गर्डर बसवण्याचे महत्त्वाचे काम सुरू झाले असून, सुरक्षेच्या कारणास्तव कल्याण-शिळ मार्गावरील वाहतुकीत मोठे बदल करण्यात आले आहेत. ठाणे शहर वाहतूक पोलिसांनी या मार्गावर रात्रीच्या वेळी ठराविक कालावधीसाठी बंदी लागू करण्याचा निर्णय घेतला आहे.
मेट्रो प्रशासनाकडून मानपाडा सर्कल ते टाटा नाका या दरम्यान गर्डर बसवण्यासाठी मोठ्या गॅन्ट्री यंत्रांचा वापर केला जाणार आहे. हे काम अत्यंत जोखमीचे असल्याने नागरिक आणि कामगारांच्या सुरक्षेसाठी ही खबरदारी घेण्यात आली आहे. ही वाहतूक बंदी 6 मार्च ते 31 मार्च 2026 या कालावधीत दररोज रात्री 11.55 ते पहाटे 5 या वेळेत लागू असेल. त्यामुळे रात्री उशिरा प्रवास करणाऱ्या वाहनचालकांनी पर्यायी मार्गांचा अवलंब करणे आवश्यक आहे.
वाहतूक बदलांचा पहिला टप्पा
मेट्रो कामाच्या पहिल्या टप्प्यात म्हणजेच 6 ते 10 मार्च या कालावधीत सोनारपाडा येथील पिलर क्रमांक 180 जवळ वाहतूक बंद ठेवली जाईल. या काळात येणाऱ्या वाहनांना मुख्य रस्त्याऐवजी डावीकडे वळवून सर्व्हिस रोडने पाठवण्यात येईल. ही वाहने डीएनएस चौक मार्गे पुढे आपल्या इच्छित स्थळी जाऊ शकतील.
विकोनाका परिसरातील बदल
दुसऱ्या टप्प्यात 11 ते 18 मार्च या दरम्यान विकोनाका येथील पिलर क्रमांक 105 जवळ प्रवेश बंद असेल. येथील वाहतूक देखील डावीकडे वळवण्यात येणार असून, वाहनांना सर्व्हिस रोडमार्गे पिलर क्रमांक 67 टाटा नाका इथून पुढे जाता येईल. या बदलामुळे मुख्य रस्त्यावरील गर्दी टाळण्यास मदत होणार आहे.
( नक्की वाचा : Badlapur News: होम लोन फेडलं तरी घर होणार सील? बदलापुरातील 'या' हायप्रोफाईल सोसायटीत खळबळ! 19 ते 25 मार्च या कालावधीत मानपाडा चौक येथील पिलर क्रमांक 200 जवळ रस्ता बंद राहील. या ठिकाणाहून प्रवास करणाऱ्या वाहनांना डावीकडे वळवून सर्व्हिस रोडने सोनारपाडा पिलर क्रमांक 180 मार्गे पुढे पाठवले जाईल. तर शेवटच्या टप्प्यात म्हणजेच 26 ते 31 मार्च दरम्यान सोनारपाडा येथील पिलर क्रमांक 164 जवळ वाहतूक रोखली जाईल. येथील वाहने सर्व्हिस रोडने वळवून पुन्हा डीएनएस चौकाजवळ मुख्य रस्त्यावर सोडली जातील. ठाणे वाहतूक पोलिसांनी रात्रीच्या वेळी प्रवास करणाऱ्या नागरिकांना या बदलांची नोंद घेण्याचे आवाहन केले आहे. मेट्रोच्या कामात सहकार्य करावे आणि शक्य असल्यास पर्यायी मार्गांचा वापर करून होणारी गैरसोय टाळावी, असे पोलिसांनी स्पष्ट केले आहे. मेट्रो लाईन 12 मुळे भविष्यात कल्याण आणि तळोजा दरम्यानचा प्रवास अधिक सुखकर होणार आहे, त्यासाठीच हे नियोजित काम पूर्ण केले जात आहे.मानपाडा चौक आणि अंतिम टप्पा
प्रवाशांना प्रशासनाचे आवाहन