Kalyan ZP School: कल्याण ग्रामीणमधील 27 गावातील जिल्हा परिषदेच्या शाळांची अवस्था दयनीय होत चालली आहे. या शाळा महापालिकेस हस्तांतरीत करण्यात आलेल्या नाहीत .त्यामुळे महापालिका या शाळेवर लक्ष देत नाही. जिल्हा परिषदेचा निधी कमी असतो. धक्कादायक म्हणजे कल्याणनजीक असलेल्या जिल्हा परिषदेच्या शाळेचे विजेचे बिल गावातील नागरिक लोकवर्गणी काढून भरत आहेत.
एकीकडे डिजिटल इंडीया, मुलांचे शिक्षणाबाबत बड्या घोषणा केल्या जातात. दुसरीकडे सरकार या शाळांचा विज बिल भरत नाही. त्यामुळे भाजप पदाधिकारी मोरेश्वर भोईर यांनी तीव्र शब्दात नाराजी व्यक्त केली आहे.
( नक्की वाचा : Kalyan: कल्याणमधल्या 2 शाळेत जायला धड रस्ताच नाही, शेकडो विद्यार्थ्यांचे हाल! मनसेचा KDMC ला अल्टीमेटम )
कल्याण ग्रामीणमध्ये 27 गावात जिल्हा परिषदेच्या 28 शाळा आहेत. 2015 साली राज्य सरकारने 27 गावे महापालिकेत समाविष्ट केली. मात्र जिल्हा परिषदेच्या या शाळा महापालिकेस हस्तांतरीत करण्यात आलेल्या नाहीत. यामधील पिसवली जिल्हा परिषदेच्या शाळेची दुरावस्था आहे. शाळेची भिंत कोसळली आहे. याबाबत माजी उपमहापौर आणि भाजप पदाधिकारी मोरेश्वर भोईर यांनी गावातील शाळांची व्यथा मांडली आहे.
भोईर यांनी सांगितलं की, या शाळांकडे महापालका लक्ष देत नाही. जिल्हा परिषदेकडे असणारा निधी अत्यल्प असतो. त्यामुळे शाळांची दुरावस्था झाली आहे. इतके नव्हे तर शाळेचे वीजेचे बिल लोकवर्गणी काढून भरले जात आहे. सरकारनं याकडे लक्ष दिले पाहिजे. ज्या प्रकारे शाळांची ही अवस्था समोर आली हे अतिशय धक्कादायक आहे. सरकारकडून डिजिटल इंडिया आणि शालेय शिक्षणावर जोर दिला जातो. परंतू शाळेचे वीजेचे बिल लोकवर्गणीतून भरले जाते. शाळेत शिक्षक कमी आहेत. संरक्षक भिंत कोसळते याकडे लक्ष दिले जात नाही, ' असं त्यांनी स्पष्ट केलं.