Kargil Vijay Diwas: कारगिल विजय दिवसाच्या मुहूर्तावर, 'वीरमाता जिजाबाई तंत्रज्ञान संस्था', मुंबईच्या वतीने मराठी सांस्कृतिक समिती रंगवर्धनतर्फे विद्यार्थ्यांसाठी एका विशेष व्याख्यानाचे आयोजन केले होते. यावेळी प्रमुख अतिथी म्हणून वीरमाता अनुराधा गोरे यांचा सन्मान करण्यात आला. त्यांनी त्यांचे सुपुत्र, शहीद कॅप्टन विनायक गोरे यांच्या बलिदानाची कथा सांगून विद्यार्थ्यांना देशसेवेत काही वर्षे सेवा देण्याचे महत्त्व पटवून दिले.
अनुराधा गोरे यांनी यावेळी कारगिल युद्धातील अनेक वीरांची यशोगाथा विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचविली. तसेच या युद्धात नौसेना आणि वायुसेना यांनी बजावलेल्या कामगिरीची माहिती दिली. भारतीय सैन्याच्या कामगिरीचे अनेक अपरिचित पैलू त्यांनी प्रकाशात आणून विद्यार्थ्यांना देशसेवेसाठी उद्युक्त केले. त्यांच्या प्रेरणादायी भाषणाने उपस्थितांचे मन जिंकले, व शौर्य आणि देशभक्तीची महती अधोरेखित केली.
( नक्की वाचा : Rajnath Singh: 'ऑपरेशन सिंदूर का थांबवलं? ', संरक्षणमंत्र्यांनी सांगितलं नेमकं कारण )
या कार्यक्रमात संचालक डॉ. सचिन कोरे तसेच विद्यार्थी क्रियाकलाप प्रमुख डॉ. सुरंजना गंगोपाध्याय यांनीही सहभाग घेत, विद्यार्थ्यांना देशसेवेमधील अभियंत्यांचे योगदान वाढविण्यासाठी सदिच्छा व्यक्त केल्या. अशा प्रेरणादायी प्रसंगामुळे युवकांमध्ये सैन्यदलातील विविध संधी आणि त्याद्वारे देशसेवेचे सर्वोच्च कर्तव्य यांची आवड वाढवण्याचा उद्देश साध्य झाला.
याप्रसंगी श्रीमती अनुराधा गोरे यांनी त्यांचे या विषयावरील पुस्तक संस्थेला ग्रंथालयास भेट दिले. संचालक डॉ सचिन कोरे यांनी अशी पुस्तके जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचावीत अशी अपेक्षा याप्रसंगी व्यक्त केली.