ऋतिक गणकवार, प्रतिनिधी
Ramesh Mhatre Bail: कल्याण डोंबिवलीचे मारकुटे नगरसेवक रमेश म्हात्रे यांचा आधारवाडी तुरुंगातून बाहेर येण्याचा मार्ग अखेर मोकळा झाला आहे. शास्त्रीनगर रुग्णालयातील डॉक्टरांना केलेल्या बेदम मारहाण प्रकरणात गेल्या काही दिवसांपासून म्हात्रे तुरुंगात आहे. या प्रकरणात गुरुवारी झालेल्या सुनावणीत न्यायालयाने म्हात्रे यांच्यावर अत्यंत कठोर अटी आणि शर्ती लादल्या असून, आरोपपत्र दाखल होईपर्यंत त्यांना थेट महाराष्ट्राच्या हद्दीबाहेर राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
उच्च न्यायालयाचे कठोर ताशेरे आणि अटी
हायकोर्ट या संदर्भातील सविस्तर आदेश जारी करणार असून, न्यायालयाने या प्रकरणी कडक भूमिका घेतली आहे. जामिनादरम्यान रमेश म्हात्रे यांना महाराष्ट्राबाहेर राहावे लागणार असून, ते जिथे असतील तिथल्या स्थानिक पोलीस ठाण्यात त्यांना मंगळवार, गुरुवार आणि शनिवारी हजेरी लावणे अनिवार्य करण्यात आले आहे.
या प्रकरणात पोलीस न्यायालयात आरोपपत्र दाखल करतील, त्यानंतर खटला संपेपर्यंत त्यांना दर बुधवारी पोलीस ठाण्यात जाऊन सही करावी लागणार आहे. खटला पूर्ण होईपर्यंत पीडित डॉक्टर किंवा कोणत्याही साक्षीदाराशी संपर्क साधण्यास त्यांना पूर्णपणे मनाई करण्यात आली असून, त्यांचा पासपोर्ट कोर्टात जमा करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.
( नक्की वाचा : Nashik News: देशासाठी गोल्ड जिंकणारा मराठी खेळाडू राज ठाकरेंच्या दारात 2 तास ताटकळला!नाशिकमधील धक्कादायक घटना )
नेमकं काय घडलं होतं ?
हा संपूर्ण धक्कादायक प्रकार 6 जुलै रोजी कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या शास्त्रीनगर रुग्णालयात घडला होता. रुग्णालयातील NICU विभाग पूर्णपणे फुल्ल असल्याने डॉक्टरांनी एका नवजात बाळाच्या नातेवाईकांना योग्य उपचारासाठी दुसऱ्या रुग्णालयात जाण्याचा सल्ला दिला होता. बाळाला वेळेत उपचार मिळावेत हाच त्यामागे डॉक्टरांचा हेतू होता. मात्र, यावरून संतापलेल्या नातेवाईकांनी तात्काळ स्थानिक नगरसेवक रमेश म्हात्रे यांना बोलावून घेतले.
( नक्की वाचा : Sunetra Pawar: 'सत्ता बदलत राहते, पण...' आईला 'गुंगी गुडीया' म्हटल्यानंतर जय पवारांची 'ती' पोस्ट चर्चेत )
डॉक्टरांवर हल्ला अन् 8 जुलैला अटक
शास्त्रीनगर रुग्णालयात पोहोचताच रमेश म्हात्रे आणि त्यांच्या कार्यकर्त्यांनी तेथील कर्मचाऱ्यांशी जोरदार वाद घालण्यास सुरुवात केली. हा वाद सुरू असतानाच म्हात्रे यांनी फोनवर बोलत असलेल्या एका महिला डॉक्टरला जोराने मारहाण केली. एवढ्यावरच न थांबता त्यांनी दुसऱ्या डॉक्टरांना आणि कर्मचाऱ्यांनाही बेदम मारहाण केली होती, ज्यामध्ये 1 डॉक्टर गंभीर जखमी झाले. या घटनेनंतर डॉक्टर आणि वैद्यकीय क्षेत्रातून तीव्र संताप व्यक्त केला गेला. याप्रकरणी कल्याण पोलिसांनी म्हात्रे आणि त्यांच्या 5 सहकाऱ्यांवर गुन्हा दाखल करून 8 जुलै 2026 रोजी रमेश म्हात्रे यांना अटक केली होती.