राहुल वाघ, प्रतिनिधी
Raj Thackeray News: मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या नाशिक दौऱ्यादरम्यान देशासाठी गोल्ड मेडल जिंकणाऱ्या मराठी खेळाडूचा घोर अपमान झाल्याचा प्रकार समोर आला आहे. नुकत्याच झालेल्या कॉमनवेल्थ गेम्समध्ये देशासाठी गोल्ड मेडल जिंकणाऱ्या दिलीप गावित आणि त्यांच्या प्रशिक्षकांना राज ठाकरे यांच्या भेटीसाठी तब्बल 2 ते 2.5 तास ताटकळत बसावे लागले. प्रदीर्घ प्रतीक्षेनंतरही भेट न झाल्याने अत्यंत संतप्त झालेल्या दिलीप गावित आणि त्यांच्या प्रशिक्षकांनी राज ठाकरेंची भेट न घेता तिथून काढता पाय घेतला.
नेमकं काय घडलं?
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे हे 6 आणि 7 ऑगस्ट 2026 या दोन दिवशीय नाशिक दौऱ्यावर आहेत. शहरातील खड्डे, महापालिकेचा कारभार, कुंभमेळा कामांची स्थिती आणि पक्षाचा आढावा घेण्यासाठी ते नाशिकमध्ये आले आहेत. याच दरम्यान कॉमनवेल्थ गेम मधील गोल्ड मेडललिस्ट दिलीप गावित आणि त्यांचे कोच वैजनाथ काळे राज ठाकरेंच्या भेटीसाठी आले होते.
मात्र त्यांना तब्बल 2 ते 2.5 तास बसवून ठेवण्यात आले. राज ठाकरेंकडून भेट मिळण्याची कोणतीही चिन्हं न दिसल्याने वैजनाथ काळे आणि दिलीप गावित संतापाच्या भारात निघून जाऊ लागले. हे पाहून मनसे पदाधिकाऱ्यांनी त्यांची मनधरणी करण्याचा प्रयत्न केला, मात्र संतप्त खेळाडू आणि प्रशिक्षकांनी कोणाचेही ऐकले नाही.
( नक्की वाचा : आता UPI व्यवहारासाठी मोजावे लागणार पैसे?; संसदेतील विधेयकात सरकारनं मांडला नवा प्लॅन )
'भेट द्यायची नव्हती तर बोलावलं कशाला?'
या अपमानकारक वागणुकीमुळे अत्यंत दुखावलेले प्रशिक्षक वैजनाथ काळे आणि दिलीप गावित यांनी मनसे पदाधिकाऱ्यांना थेट सुनावले. जर भेट द्यायचीच नव्हती तर मग आम्हाला बोलावलं कशाला, असा संतप्त सवाल त्यांनी उपस्थित केला. राज ठाकरे हे नक्कीच महाराष्ट्राचे मोठे नेते आहेत, मात्र आम्हीदेखील महाराष्ट्रासाठी आणि देशासाठी खूप मोठे योगदान दिले आहे, अशा शब्दांत त्यांनी आपला स्वाभिमान आणि राग व्यक्त केला.
कोण आहे दिलीप गावित?
नुकत्याच पार पडलेल्या राष्ट्रकुल स्पर्धेत पुरुषांच्या 100 मीटर टी-47 अंतिम शर्यतीत नाशिक जिल्ह्यातील सुरगाणा तालुक्यातील अतिदुर्गम आदिवासी पाड्यातील दिलीप महादू गावित याने ऐतिहासिक कामगिरी केली होती. दिलीपने अवघ्या 10.71 सेकंदाची विक्रमी वेळ नोंदवत गोल्ड मेडल पटकावले आणि संपूर्ण जगात भारताची मान उंचावली.
( नक्की वाचा : Sunetra Pawar: 'सत्ता बदलत राहते, पण...' आईला 'गुंगी गुडीया' म्हटल्यानंतर जय पवारांची 'ती' पोस्ट चर्चेत )
आंतरराष्ट्रीय स्तरावर देशाचा झेंडा फडकवणारा हा खेळाडू सुरगाणा तालुक्यातील अलंगुण येथील आदर्श समता शिक्षण प्रसारक मंडळाच्या शहीद भगतसिंग माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयाचा माजी विद्यार्थी आहे. अत्यंत प्रतिकूल परिस्थितीतून पुढे आलेल्या अशा राष्ट्रीय खेळाडूला ताटकळत ठेवल्याने क्रीडाप्रेमींमध्ये नाराजी व्यक्त होत आहे.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world