KDMC Election 2026: कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या राजकारणात मोठी खळबळ उडाली आहे. शिवसेना (उबाठा) पक्षाच्या मशाल चिन्हावर निवडून आलेले दोन नगरसेवक थेट शिवसेना (शिंदे) पक्षाच्या संपर्कात असल्याचं स्पष्ट झालंय. या प्रकरणात आता ठाकरे गटाने आता आक्रमक पाऊल उचलले आहे. पक्षाशी बंडखोरी करणाऱ्या या दोन नगरसेवकांना अपात्र ठरवण्यासाठी ठाकरे गटाने हालचालींना वेग दिला असून राजकीय वर्तुळात याची जोरदार चर्चा सुरू झाली आहे.
काय आहे प्रकरण?
कल्याण डोंबिवली महानगरपालिका निवडणुकीत शिवसेना (उबाठा) पक्षाचे एकूण 11 नगरसेवक निवडून आले होते. पक्षाची पुढील रणनीती ठरवण्यासाठी आणि गटनेत्याची निवड करण्यासाठी सोमवारी एक महत्त्वाची बैठक बोलावण्यात आली होती. केडीएमसीतील या बैठकीत नवनिर्वाचित नगरसेवकांची उपस्थिती अनिवार्य होती.
मात्र, या बैठकीला 11 पैकी केवळ 9 नगरसेवक उपस्थित होते. मधूर म्हात्रे आणि किर्ती ढोणे हे दोन नगरसेवक बैठकीला अनुपस्थित राहिल्याने सर्वांच्या भुवया उंचावल्या आहेत.
( नक्की वाचा : KDMC Election 2026 : कल्याण डोंबिवलीत 'पॉवर गेम' महापौरपदी कुणाची होणार निवड? वाचा कोण आहेत प्रबळ दावेदार )
ठाकरे गटाच्या गटनेते पदाची निवडणूक
या बैठकीमध्ये उमेश बोरगांवकर यांची शिवसेना ठाकरे गटाच्या गटनेते पदी एकमताने निवड करण्यात आली आहे. बोरगांवकर यांच्या निवडीबाबतचे अधिकृत पत्र पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याकडे मान्यतेसाठी पाठवण्यात आले आहे. बोरगांवकर आता महापालिकेत ठाकरे गटाचे नेतृत्व करतील. मात्र, गटनेत्याच्या निवडीपेक्षा अनुपस्थित राहिलेल्या दोन नगरसेवकांच्या बंडखोरीची चर्चा जास्त रंगली आहे.
बंडखोर नगरसेवकांच्या घरावर नोटीस
मधूर म्हात्रे आणि किर्ती ढोणे हे दोन्ही नगरसेवक गेल्या काही काळापासून नॉट रिचेबल आहेत. ते शिवसेना शिंदे गटाच्या संपर्कात असल्याची दाट शक्यता वर्तवण्यात येत आहे. या पार्श्वभूमीवर ठाकरे गटाचे जिल्हा प्रमुख शरद पाटील यांनी कठोर पावले उचलली आहेत.
बैठकीपूर्वीच या दोन्ही नगरसेवकांच्या कुटुंबियांना पक्षाची नोटीस बजावण्यात आली असून, त्यांच्या घराच्या भिंतीवरही ही नोटीस चिकटवण्यात आली आहे. या नोटीसद्वारे त्यांना बैठकीला हजर राहण्याचे आदेश देण्यात आले होते, मात्र त्यांनी त्याकडे पाठ फिरवली.
( नक्की वाचा : KDMC Election 2026: कल्याण डोंबिवलीत भाजपा नेत्याचा महापौरपदाबाबत खळबळजनक दावा, शिवसेना काय करणार? )
अपात्रतेच्या कारवाईसाठी कोकण आयुक्तांकडे धाव
पक्षाच्या आदेशाचे उल्लंघन करणाऱ्या या दोन्ही सदस्यांवर कारवाई करण्यासाठी शरद पाटील आता थेट कोकण विभागीय आयुक्तांकडे गेले आहेत. पक्षाच्या गट स्थापनेची प्रक्रिया पूर्ण करणे आणि बंडखोरी करणाऱ्या म्हात्रे आणि ढोणे यांच्यावर अपात्रतेची कायदेशीर कारवाई करणे, या दोन प्रमुख उद्देशांसाठी त्यांनी आयुक्तांची भेट घेतली आहे.
मशाल चिन्हावर निवडून येऊन दुसऱ्या गटात सामील होऊ पाहणाऱ्या या नगरसेवकांचे पद धोक्यात येण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
आता या दोन नगरसेवकांवर नेकी काय कारवाई होणार आणि शिंदे गट त्यांना कशा प्रकारे पाठबळ देणार, याकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले आहे. ठाणे आणि कल्याणमधील शिवसेनेच्या या सत्तासंघर्षामुळे आगामी काळात महापालिकेतील समीकरणे बदलण्याची चिन्हे दिसत आहेत.