KDMC Election 2026 : कल्याण डोंबिवलीत शिंदेंना पाठिंबा का दिला? मनसे नेत्यांनी सांगितली A to Z कारणं

KDMC Election 2026 : कल्याण डोंबिवलीच्या सत्तेत कोणाचे वर्चस्व राहणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले असताना मनसेच्या या निर्णयाने गणिते बदलली आहेत.

जाहिरात
Read Time: 3 mins
KDMC Election 2026 : मनसे नेत्यांनी शिवसेनेला पाठिंबा का दिला? याची कारणं सांगितली आहेत.
कल्याण:

KDMC Election 2026 : कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या राजकारणात मोठी उलथापालथ झाली आहे. निवडणुकीच्या निकालानंतर सत्तास्थापनेसाठी हालचाली वेगाने सुरू असतानाच आता राज ठाकरे यांच्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला पाठिंबा जाहीर केला आहे. ठाकरे बंधूंनी महानगरपालिका निवडणूक एकत्र लढली होती. या निवडणुकीनंतर आठवडाभराच्या आतच मनसेने घेतलेल्या या भूमिकेमुळे उद्धव ठाकरे यांच्या गटाला मोठा धक्का मानला जात आहे. कल्याण डोंबिवलीच्या सत्तेत कोणाचे वर्चस्व राहणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले असताना मनसेच्या या निर्णयाने गणिते बदलली आहेत.

सत्तास्थापनेसाठी मनसेचा पाठिंबा

कल्याण डोंबिवली महापालिकेवर सत्ता स्थापन करण्यासाठी 62 या बहुमताच्या आकड्याची गरज आहे. सध्याच्या पक्षीय बलाबलानुसार एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेकडे 53 नगरसेवक आहेत, तर भाजपचे 50 नगरसेवक निवडून आले आहेत. या निवडणुकीत उद्धव ठाकरे यांच्या गटाचे 11 आणि मनसेचे 5 नगरसेवक विजयी झाले. 

मात्र निकाल लागल्यानंतर लगेचच ठाकरे गटाचे दोन नगरसेवक बेपत्ता झाल्याने खळबळ उडाली होती. हे दोन नगरसेवक शिवसेनेत सामील होण्याची दाट शक्यता वर्तवली जात असतानाच, आता मनसेने शिंदेंच्या शिवसेनेला पाठिंबा देण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे शिवसेनेचा सत्तेचा मार्ग अधिक सुकर झाला आहे.

( नक्की वाचा : KDMC Election 2026 : कल्याण डोंबिवलीत 'पॉवर गेम' महापौरपदी कुणाची होणार निवड? वाचा कोण आहेत प्रबळ दावेदार )

मनसेनं पाठिंबा का दिला?

मनसेचे माजी आमदार राजू पाटील यांनी या पाठिंब्याबाबत महत्त्वाची प्रतिक्रिया दिली आहे. त्यांनी सांगितले की, शहराच्या विकासकामांना गती मिळावी यासाठी आम्ही हा निर्णय घेतला आहे. राजकारणात घोडेबाजार होऊ नये, ही आमची प्रामाणिक इच्छा होती. सत्तेत राहून जनतेची कामे होणे जास्त महत्त्वाचे आहे, असेही त्यांनी स्पष्ट केले. निवडणूक निकालानंतर काही नगरसेवक गायब होण्याचे प्रकार घडले आहेत. त्याचाही संदर्भ राजू पाटील यांनी दिला.

Advertisement

कुणीही कुणाचा कायमचा शत्रू नसतो

मनसेचे ज्येष्ठ नेते बाळा नांदगावकर यांनी या घडामोडीवर भाष्य करताना सकारात्मकतेवर भर दिला. राजकारणात कोणीही कोणाचा कायमचा शत्रू नसतो, असे सांगत त्यांनी या निर्णयाचे समर्थन केले. कोणत्याही गोष्टीकडे नकारात्मक दृष्टीने पाहण्याऐवजी सकारात्मक विचार करून निर्णय घेणे आवश्यक असते, असे मत त्यांनी व्यक्त केले. स्थानिक राजकारणातील ही समीकरणे भविष्यातील नव्या युतीचे संकेत मानली जात आहेत.

( नक्की वाचा : Jitendra Awhad : 'कैसा हराया'! जितेंद्र आव्हाडांच्या हातातून मुंब्रा निसटतंय? वाचा का सुरु झालीय चर्चा )
 

स्थानिक परिस्थितीनुसार राज ठाकरेंची संमती

मनसे नेते संदीप देशपांडे यांनी याबाबत राज ठाकरेंचा आदेश काय होता? हेच सांगून टाकलं. निवडणुकीनंतर स्थानिक पातळीवर काय निर्णय घ्यायचा, याचे पूर्ण स्वातंत्र्य राज ठाकरे यांनी राजू पाटील यांना दिले होते. पक्षहित आणि स्थानिक राजकारण लक्षात घेऊन हा निर्णय घेण्यात आला आहे. आम्ही निवडणुकीत उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेसह सर्वच पक्षांच्या विरोधात लढलो होतो, याची आठवणही त्यांनी करून दिली. कल्याण डोंबिवलीतील विकास आणि नगरसेवकांचे हित लक्षात घेऊनच हा पाठिंबा देण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.

Advertisement

कल्याण डोंबिवली महापालिकेतील पक्षीय बलाबल

एकूण जागा - 122
शिवसेना - 53
भाजप - 50 
उबाठा - 11 
मनसे - 5 
काँग्रेस - 2 
राष्ट्रवादी (शरद पवार) - 1