रिझवान शेख, योगेश पाटील, प्रतिनिधी
Thane Municipal Election Result 2026: ठाणे महानगरपालिका निवडणुकीच्या निकालांनी सर्वांचे लक्ष वेधून घेतले असून मुंब्र्यात शरद पवार यांच्या पक्षाला मोठा धक्का बसला आहे. आमदार जितेंद्र आव्हाड यांचा बालेकिल्ला समजल्या जाणाऱ्या मुंब्र्यातील प्रभाग क्रमांक 30 मध्ये एमआयएम पक्षाने मुसंडी मारली आहे. एमआयएमच्या उमेदवार सहर शेख या तरुणीने तब्बल 5299 मतांच्या फरकाने विजय मिळवत सर्वांना थक्क केले आहे. सहर शेख यांचे वडील युनूस शेख आणि जितेंद्र आव्हाड यांच्यातील जुना वाद या विजयामुळे पुन्हा एकदा चर्चेत आला आहे.
जितेंद्र आव्हाडांना मोठा धक्का
युनूस शेख यांनी आपल्या मुलीसाठी, सहर शेखसाठी शरद पवार गटाकडून उमेदवारीची मागणी केली होती. मात्र, अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवसापर्यंत त्यांना ताटकळत ठेवण्यात आले आणि अखेर राष्ट्रवादीने तिकीट नाकारले. यामुळे संतापलेल्या युनूस शेख यांनी एमआयएममध्ये प्रवेश करून आपल्या मुलीला निवडणूक रिंगणात उतरवले.
सहर शेख यांनी 12964 मते मिळवून विजय संपादन केला, तर आव्हाड यांच्या समर्थक उमेदवार रुमाना शेख यांना केवळ 7665 मते मिळाली. या निकालाने मुंब्र्यातील राजकीय समीकरणे बदलली असून आव्हाडांच्या गडाला सुरुंग लागल्याचं मानलं जात आहे.
( नक्की वाचा : Jitendra Awhad : 'झुटा जितेंदर, तुतारीची मुतारी'23 वर्ष जुना सहकारी युनस शेख आव्हाडांवर भर सभेत घसरले, VIDEO )
आव्हाडांवर तिखट हल्ला
निवडणुकीत विजय मिळवल्यानंतर आयोजित सभेत सहर शेख यांनी जितेंद्र आव्हाड यांच्यावर जोरदार टीका केली. आपण लोकांच्या अहंकाराच्या चिंधड्या उडवल्या असून आम्ही कोणाच्या बापाचे मिंधे नाही, अशा शब्दांत त्यांनी आव्हाडांना सुनावले.
काही लोकांना वाटत होते की आपण त्यांचे गुलाम आहोत, पण आमच्यासाठी केवळ अल्लाह सर्वोच्च आहे, असेही त्या म्हणाल्या. पाच वर्षांनंतर यापेक्षा मोठे प्रत्युत्तर देऊ, असा इशारा देत त्यांनी आव्हाडांच्या नेतृत्वाला उघडपणे आव्हान दिले आहे.
मुंब्रा हिरवा करण्याच्या वक्तव्यावरुन नवा वाद
या विजयी सभेत सहर शेख यांनी संपूर्ण मुंब्रा आपल्याला हिरव्या रंगाने व्यापून टाकायचा आहे, असे विधान केले. या विधानामुळे राजकीय वर्तुळात नवा वाद निर्माण झाला आहे. मात्र, टीका होताच सहर शेख यांनी स्पष्टीकरण दिले की, त्यांच्या पक्षाच्या झेंड्याचा रंग हिरवा असल्याने त्यांनी तसे वक्तव्य केले होते. प्रभाग क्रमांक 30 मधील चारही नगरसेवक एमआयएमचे निवडून आल्याने कार्यकर्त्यांमध्ये प्रचंड उत्साह दिसून येत आहे.
युनूस शेख यांचा आव्हाडांना थेट इशारा
युनूस शेख आणि जितेंद्र आव्हाड हे एकेकाळचे मित्र होते, मात्र विधानसभा निवडणुकीपासून त्यांच्यात दुरावा निर्माण झाला. पालिका निवडणुकीत मुलीला तिकीट न मिळाल्याने हा वाद टोकाला गेला.
( नक्की वाचा : TMC Election 2026 : ठाण्यात शिवसेनेचेच वर्चस्व; महापौरपदासाठी 'ही' नावं आघाडीवर, पाहा कुणाला देणार शिंदे बढती! )
विजयानंतर युनूस शेख यांनी आव्हाडांना उद्देशून, माझ्या मुलीचा नाद करू नको, तुझ्या नादाने पतंग उडवेन, असा इशारा दिला. मुंब्र्यातून मिळणाऱ्या मतांच्या जोरावर आव्हाड सलग 4 वेळा आमदार राहिले आहेत, मात्र आता त्यांच्याच भागात शेख बाप-लेकीने दिलेले हे आव्हान त्यांच्यासाठी धोक्याची घंटा मानली जात आहे.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world