KDMC News: कल्याण डोंबिवली शहराच्या विद्रुपीकरणासह महापालिकेच्या तिजोरीवर डल्ला मारणारा एक मोठा गैरप्रकार समोर आला असून यामुळे राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे. अनधिकृत होर्डिंग्जच्या माध्यमातून शहरात एक समांतर व्यवस्था उभी राहिली असून यामध्ये काही बड्या नावांचा समावेश असल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. विशेष म्हणजे, ज्यांच्यावर कारवाईची जबाबदारी आहे, तेच अधिकारी आता संशयाच्या भोवऱ्यात सापडले आहेत.
कोट्यवधी रुपयांचा महसूल पाण्यात
कल्याण डोंबिवलीत सध्या सुमारे 450 ते 500 अनधिकृत होर्डिंग्जचा सुळसुळाट झाला असून यामुळे महापालिकेचा जवळपास 10 कोटी रुपयांचा महसूल बुडत असल्याचा गंभीर आरोप भाजपा नगरसेवक दीपेश म्हात्रे यांनी केला आहे. काही समाजकंटक आणि राजकीय पक्षांमधील पदाधिकारी या बेकायदा धंद्यात सक्रिय असून त्यांनी महापालिकेच्या उत्पन्नाला मोठा चुना लावला असल्याचे त्यांनी आयुक्तांच्या निदर्शनास आणून दिले आहे.
गेल्या वर्षी पावसाळ्यात शहरात होर्डिंग कोसळल्याच्या 2 ते 3 घटना घडल्या होत्या. त्यावेळी प्रशासनाने अनधिकृत होर्डिंग्जवर कठोर कारवाई करण्याचे आश्वासन दिले होते. मात्र, प्रत्यक्षात परिस्थिती वेगळीच असल्याचे दिसते. अनधिकृत होर्डिंग लावणाऱ्यांवर केवळ कारवाई न करता त्यांच्यावर फौजदारी गुन्हे दाखल करावेत आणि संबंधित प्रभाग अधिकाऱ्यांनाही यासाठी जबाबदार धरून त्यांच्यावर कारवाई करावी, अशी मागणी दीपेश म्हात्रे यांनी आयुक्त अभिनय गोयल यांच्याकडे केली आहे.
( नक्की वाचा : Ulhasnagar News: लग्नानंतर अचानक समोर आला बुरखा अन् गोमांस; उल्हासनगरच्या हिंदू मुलीचा बिहारमध्ये भयंकर छळ )
अधिकाऱ्यांवर राजकीय दबाव?
या प्रकरणावर महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त योगेश गोडसे यांनी आपली बाजू मांडली आहे. काही होर्डिंग्जच्या बाबतीत प्रकरणे न्यायप्रविष्ट असून त्यांना स्थगिती मिळाली आहे, असे त्यांनी सांगितले. तरीही अनधिकृत होर्डिंग्जवर कारवाई करण्याच्या सूचना प्रभाग अधिकाऱ्यांना देण्यात आल्याचे त्यांनी स्पष्ट केले. मात्र, प्रत्यक्षात कारवाई होताना दिसत नसल्याने अधिकाऱ्यांवर नेमका कोणाचा राजकीय दबाव आहे, असा प्रश्न आता उपस्थित केला जात आहे. अनधिकृत होर्डिंग्जमुळे केवळ आर्थिक नुकसानच नाही, तर नागरिकांच्या सुरक्षेचा प्रश्नही निर्माण झाला असल्याने प्रशासन आता काय पाऊल उचलणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.