KDMC Mayor Election : कल्याण डोंबिवलीचे कारभारी ठरले! मनसेच्या साथीनं महायुतीचे महापौर-उपमहापौर निश्चित

KDMC Mayor Election 2026 : कल्याण डोंबिवलीच्या महापौर कोण होणार हे आता स्पष्ट झाले आहे.

जाहिरात
Read Time: 2 mins
कल्याण:

KDMC Mayor Election 2026 :  कल्याण डोंबिवलीच्या महापौर कोण होणार हे आता स्पष्ट झाले आहे. महापौर पदासाठी  शुक्रवारी (30 जानेवारी 2026) शिवसेना शिंदे गटाच्या हर्षाली थवील-चौधरी यांनी अर्ज भरला. तर उपमहापौर पदासाठी भाजपाचे राहुल दामले यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. विशेष म्हणजे या निवडणुकीत मनसेने महायुतीला पाठिंबा दिल्याने ही निवडणूक बिनविरोध होण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे.

महायुतीची ताकद आणि राजकीय समीकरणे

या उमेदवारी अर्जांच्या वेळी कल्याणचे खासदार डॉ. श्रीकांत शिंदे, मनसे आमदार राजू पाटील, शिवसेना शिंदे गटाचे आमदार राजेश मोरे, जिल्हा प्रमुख गोपाळ लांडगे आणि भाजप जिल्हाध्यक्ष नंदू परब यांसारखे दिग्गज नेते उपस्थित होते. 

खासदार शिंदे यांनी यावेळी बोलताना  स्पष्ट केले की, मनसे प्रमुख राज ठाकरे आणि आमदार राजू पाटील यांनी दिलेल्या पाठिंब्यामुळे महायुतीची शक्ती अधिक वाढली आहे. शिवसेना आणि भाजपची ताकद आधीच मोठी होती, त्यात आता मनसेची साथ मिळाल्याने ही निवडणूक केवळ औपचारिकता उरली असून दोन्ही उमेदवार बिनविरोध निवडून येतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

( नक्की वाचा : ZP Election 2026 : 12 जिल्हा परिषदांच्या निवडणुकींची तारीख बदलली; मतदान कधी? वाचा A टू Z माहिती एका क्लिकवर )
 

पारदर्शक कारभार आणि रखडलेल्या प्रकल्पांवर भर

महापौर पदाच्या उमेदवार हर्षाली थवील-चौधरी यांनी पक्षाने दाखवलेल्या विश्वासाबद्दल कृतज्ञता व्यक्त केली आहे. महापालिकेचा कारभार स्वच्छ आणि पारदर्शक पद्धतीने चालवण्यावर माझा भर असेल, असे त्यांनी यावेळी सांगितले. शहरातील जे प्रकल्प काही कारणास्तव रखडले आहेत, ते मार्गी लावण्यासाठी प्राधान्याने प्रयत्न करणार असल्याची ग्वाही त्यांनी दिली आहे. सामान्य कुटुंबातून येऊन वकील म्हणून ओळख निर्माण करणाऱ्या हर्षाली थवील-चौधरी या दुसऱ्यांदा नगरसेविका म्हणून निवडून आल्या आहेत. अनुसूचित जमातीसाठी महापौर पद राखीव झाल्याने त्यांना ही मोठी संधी मिळाली आहे.

Advertisement

( नक्की वाचा : Ajit Pawar 'किंगमेकर' गेला, आता खेळाडू बदलणार! अजित पवारांनंतर राज्याच्या अर्थकारण आणि सहकारावर कोणाचं वर्चस्व )

अनुभवी राहुल दामले यांच्यावर पुन्हा जबाबदारी

उपमहापौर पदाचे उमेदवार राहुल दामले यांनी या संधीबद्दल महायुतीच्या नेत्यांचे आभार मानले आहेत. गेल्या 5 वर्षांत लोकप्रतिनिधी नसल्याने प्रशासकीय कामकाजात ज्या उणीवा राहिल्या, त्या दूर करून विकासाला गती देण्याचे काम करणार असल्याचे त्यांनी सांगितले. राहुल दामले हे महापालिकेतील अत्यंत अनुभवी नाव असून त्यांनी 2005 मध्ये स्वीकृत नगरसेवक म्हणून सुरुवात केली होती. त्यानंतर 2010, 2015 आणि 2026 मध्ये ते निवडून आले आहेत. यापूर्वी 2013-14 मध्ये त्यांनी उपमहापौर पद भूषवले असून स्थायी समिती सभापती आणि विरोधी पक्षनेते म्हणूनही त्यांनी काम पाहिले आहे.