तन्मय टिल्लू, प्रतिनिधी
Maharashtra Politics After Ajit Pawar: राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या अकाली निधनामुळे राज्याच्या राजकारणात अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत. त्यामुळे राजकारणात मोठी उलथापालथ होणार का, असा प्रश्न उपस्थित होत आहे. मुळात राष्ट्रवादीची पॉकेट्स आणि पश्चिम महाराष्ट्रातील सहकाराचा पट्टा आणि तेथील राजकारणावर कसा परिणाम होणार याबाबत आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.
28 जानेवारी 2026 रोजी बारामतीजवळ विमान अपघातात उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख नेते अजित पवारांचा अतर्क्य, अकाली आणि अनपेक्षित मृत्यू झाला. अर्थातच राज्यातील प्रत्येकासाठी ही बातमी सुन्न करणारी होती. 29 जानेवारीला बारामतीत शासकीय इतमामात अजित पवारांवर अंत्यसंस्कार पार पडले. त्यानंतर आता पुढे काय, हाच प्रश्न राज्याच्या राजकीय पटलावर आणि साहजिकच राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यापासून पहिल्या फळीतील नेत्यांपर्यंत उपस्थित झाला आहे. म्हणजेच आता खऱ्या अर्थी राजकीय खेळ सुरु झाला आहे.
बंडखोरी ते सत्तेचा सोपान: दादांचा राजकीय प्रवास
खरंतर या खेळाची सुरुवात अजित पवारांनी 2023 मध्येच केली. तशी ती आधीही पहाटेचा शपथविधी घेऊनही करण्यात आली होती. मात्र तो खेळ फसला आणि अजित पवारही अडकले होते. त्यानंतर दुसऱ्या डावात ठिकाण होतं मुंबईतील यशवंतराव चव्हाण सभागृह आणि विषय होता साहेबांच्या म्हणजेच शरद पवारांच्या निवृत्तीचा. इथूनच अजित पवारांचं नेतृत्व खऱ्या अर्थी फुलू लागणार अशी चुणूक राजकीय जाणकारांनी व्यक्त केली होती.
साहेबांनी निवृत्त व्हावं नव्या नेतृत्त्वाला संधी द्यावी, अशी स्पष्ट, रोखठोक भूमिका त्यावेळी मांडणारे एकमेव अजित पवारच होते. त्यामुळे त्यांच्यावर टीकाही झाली. मात्र या प्रकारानंतर अजित पवारांनी धाडसी निर्णय घेत बाहेर पडण्याचा निर्णय घेतला आणि यावेळी तो यशस्वी झाला. एकसंध राष्ट्रवादीची दोन शकलं झाली आणि अजित पवारांची राष्ट्रवादी थेट युतीत म्हणजेच सत्तेत सहभागी झाली.
( नक्की वाचा : Ajit Pawar Death : अजित पवारांच्या मृत्यूनंतर 5 बदल अटळ, फडणवीस ते शरद पवार सर्वांची कशी वाढणार डोकेदुखी ? )
काकांचा वारसा नाकारून स्वतःची ओळख निर्माण करण्याची जिद्द
अजित पवार म्हणजे शरद पवारांचा पुतण्या ही एवढीच ओळख कदाचित अजित पवारांना नको होती. त्यापेक्षा काहीतरी वेगळं करुन स्वतःचं कर्तृत्व सिद्ध करण्याची त्यांची धडपड कधीच लपून राहिली नाही. म्हणूनच दादा धाडसी निर्णय घेताना अनेकदा दिसून आले. कोणत्याही मोठ्या वृक्षाखाली लहान झाडं तग धरु शकत नाही हे अजित पवार ओळखून होते. कारण वारसा हक्काने आलेल्या कोणत्याही जबाबदारीत स्वतःचं कर्तृत्व सिद्ध करणं हे जवळपास अशक्यप्राय आणि जीवघेणं ठरतं. म्हणूनच या छत्रछायेखालून बाहेर पडत प्रसंगी टीका सहन करत अजित पवारांनी घराण्याशी फारकत घेतली होती.
राज्याच्या राजकारणातच नाही तर देशाच्या राजकारणातील वलयांकित कुटुंब म्हणजे पवार कुटुंब होय. कायम एकसंध असणाऱ्या या कुटुंबात दरी निर्माण होईल असा विचार कुणीही केला नव्हता, मात्र अजित पवारांकडून ते घडलं आणि राजकारण बदललं.
( नक्की वाचा : Ajit Pawar : बारामतीत अजित पवारांच्या विमानात शेवटच्या क्षणी काय घडलं? तज्ज्ञांनी कॉकपिटमधून सांगितलं कारण )
प्रशासनावरील पकड आणि 'दादा'गिरीची वैशिष्ट्ये
त्यांच्यातील स्पष्टवक्तेपणा, सडेतोडपणा, निःसंदिग्धपणा, प्रशासनावर त्यांची असलेली वेगळी पकड, प्रत्येक विषयातील त्यांचा असलेला बारीक अभ्यास, अर्थकारणाची जाण, वक्तशीरपणा अशा असंख्य गुणांमुळे आणि स्वभावपैलुंमुळे ते खऱ्याअर्थी दादा ठरतात. मुळात, राजकारणात दोन प्रकारची लोकं असतात, एक फक्त राजकारणी आणि दुसरे म्हणजे ज्यांना विषयाची जाण असते, स्वतःचा अभ्यास असतो, दूरचे पाहणारे असे नेतृत्व असते.
साहजिकच अजितदादा हे कोणत्या प्रकारात बसणारे आहेत हे वेगळं लिहण्याची गरज नाही. मात्र अजित पवारांच्या जाण्याने आता बरेच प्रश्न समोर उभे ठाकले आहेत. त्यात प्रामुख्याने पश्चिम महाराष्ट्रातील सहकार, साखर कारखाने, सिंचन प्रकल्प, शेती आणि राज्यातील आर्थिक गणितं, यासह महायुतीचं काय होणार, त्यांच्या जाण्याने निर्माण झालेल्या पोकळीचा फायदा कोण घेणार आणि त्याचा परिणाम कसा होणार, हे पाहणे महत्त्वाचे ठरेल.
(नक्की वाचा : Ajit Pawar :'आणि दादांनी कौतुकानं फोन केला,' विश्वास नांगरे पाटलांनी जागवल्या आठवणी, हळवी पोस्ट Viral )
महायुतीचे भवितव्य आणि राष्ट्रवादीतील अस्वस्थता
आधी महायुती सरकारचं काय, हे पाहू. महायुतीकडे विधानसभेत बहुमत आहे, त्यामुळे सरकार पडण्याची शक्यता नाही. पण अजितदादांच्या अनुपस्थितीत राष्ट्रवादीच्या गटातील आमदारांमध्ये अस्वस्थता येऊ शकते. काही आमदार भाजपकडे वळतील, कारण अर्थातच भविष्यातील राजकीय सुरक्षा आणि आगामी काळात तिकीट मिळण्याची शक्यता त्यांना खुणावत असेल.
दुसरीकडे आगामी जिल्हा परिषद आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लवकरच होऊ घातल्या आहेत. बारामती आणि पश्चिम महाराष्ट्रात अजित पवारांच्या राष्ट्रवादीला सहानभूतीचा फायदा मिळू शकतो. तसंही पालिका निवडणुकीत दोन्ही राष्ट्रवादी एकत्रच लढल्या होत्या. त्यामुळे हाच पॅटर्न जिल्हा परिषद, पंचायत समितीत पाहायला मिळेल आणि त्याचा फायदा राष्ट्रवादीला होईल.
वारसदार कोण? नेतृत्वाचा पेच कायम
मुळात प्रश्न उरतो पुढे कोण? या प्रश्नाचं उत्तर तसं कठीण आहे. कारण अजितदादांचा उत्तराधिकारी म्हणून राज्याच्या राजकारणात लगेचच सक्रिय होईल असं पवार आडनावाचं कोणी नाही. 2019 मध्ये पार्थ पवारांना प्रोजेक्ट करण्याच्या प्रयत्नात अजित पवार सपशेल अपयशी ठरले होते. यावेळी त्यांनी शरद पवारांची नाराजीही ओढवून घेतली होती.
पार्थ पवार सक्रिय राजकारणात अजूनही नवखेच आहेत. जय पवार मुख्यतः व्यवसाय सांभाळतात, त्यामुळे त्यांचाही थेट राजकारणाशी संबंध नाही. 2024 च्या लोकसभा निवडणुकीत पवार कुटुंबात ज्यांच्यासाठी द्वंद्व झालं त्या सध्याच्या राज्यसभेच्या खासदार सुनेत्रा पवार यांना संधी द्यावी अशी मागणीही जोर धरतेय. त्या फारतर पक्षाचा चेहरा होऊ शकतात असंही काही राजकीय जाणकारांचं मत आहे. मात्र राष्ट्रवादीच्या गटातील काही आमदार भाजपची वाट धरु शकतात.
सहकार क्षेत्रातील बदल आणि भाजपाची रणनीती
अजित पवारांच्या अकाली निधनाने राज्याच्या राजकारणातील पॉवर गेम भाजपच्या राजकीय ताकदीत अधिक भर घालू शकतो. अजितदादांकडे अर्थखातं होतं, ते भाजप स्वतःकडे घेण्याचा प्रयत्न नक्कीच करेल. त्यातही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची शक्यताच अधिक आहे. त्यामुळे शिंदे गटावरही वचक ठेवता येईल. परिणामी या पोकळीचा फायदा भाजप अधिक करुन घेताना पाहायला मिळेल.
दुसरीकडे राष्ट्रवादीचा मुळ गाभा आणि आधार असलेल्या सहकार क्षेत्रावर याचा मोठा प्रभाव पाहायला मिळू शकतो. आधीच भाजपाच्या शीर्ष नेतृत्वाने म्हणजेच केंद्रीय सहकारमंत्री अमित शहांनी कारभार हाती घेतल्याने राज्यात बरेच बदल घडलेत. राष्ट्रवादी वाढली आणि बहरली ती पश्चिम महाराष्ट्रातील सहकाराच्या पायावर, याची जाणीव भाजपला झाली आहे. तेव्हापासून साखर कारखानदार घराण्यांना गळाला लावण्याचे किंवा त्यांच्या ठप्प सहकार उद्योगांना अनुदानरुपी संजीवनी देऊन भाजपने गेल्या काही वर्षात राजकारण साधलंय. त्यामुळे या पट्ट्यातही भाजपचा जोर वाढताना दिसू शकतो.
एकसंध राष्ट्रवादीची शक्यता आणि पुढील आव्हाने
या सगळ्या घडामोडीत दोन राष्ट्रवादी एकत्र आल्यास पुन्हा नेतृत्त्वाचा मुद्दा उद्भवतो. खासदार सुप्रिया सुळे किंवा आमदार रोहित पवारांच्या नेतृत्त्वात काम करायला राष्ट्रवादीत आधीच मनभेद आणि मतभेद आहेत. जयंत पाटील आणि रोहित पवारांमधील शाब्दिक खटके तर सर्वश्रुत आहेत. त्यामुळे राष्ट्रवादीतील किती नेते यासाठी तयार होतील हा प्रश्नच आहे. त्यामुळे हे सोपं नाही.
विरोधक म्हणजे काँग्रेस आणि शिवसेना ठाकरे गट या राजकीय पोकळीतून काही फायदा करुन घेतील इतका राजकीय उत्साह आणि रणनीती दोन्ही पक्षांच्या नेतृत्त्वात आहे का, हे शोधावं लागेल. त्यामुळे सध्या निर्माण झालेल्या पोकळीत राज्याचं राजकारण अधिक भाजप-केंद्रित होताना दिसू शकतं. अजित पवारांसारखा प्रशासनावर वचक असणारा आणि सरकारची आर्थिक बाजू जबाबदारीने सांभाळणारा नेताच हरवल्याने सरकारमधील बॅलन्स थोडासा डगमगेल.
राष्ट्रवादी ही अनेक फांद्यांची एकसंध मोळी आहे. त्याला पवार नावाच्या दोरीने आजवर घट्ट बांधून ठेवलं होतं. मोळीचे दोन भाग झाले तरी पवार नावाचीच दोरी त्यांना घट्ट बांधून ठेवत आहे. त्यातील एक दोरी नियतीने सोडली आहे, त्यामुळे राज्याच्या राजकारणात आगामी काळात काही सुप्त तर काही स्पष्ट बदल होताना पाहायला मिळतील.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world