KDMC News: कल्याण- कल्याण डोंबिवली महापालिकेत ई ई-ऑफिस प्रणाली राबविण्यात आली आहे. मात्र मुन्सिपल कर्मचारी कामगार सेनेने कामगारांच्या संदर्भात गेल्या दीड वर्षात ई ई-ऑफिस प्रणाली द्वारे 28 पत्रे दिली आहेत. त्याचे पुढे काय झाले ? याची विचारणा करण्यासाठी कामगार संघटनेचे पदाधिकारी आयुक्तांच्या कार्यालयात पोहचले. तेव्हा आयुक्त कार्यालयाकडून सांगण्यात आले की, त्यांना 28 पैकी एकही पत्र प्राप्त झालेले नाही.
हे ऐकून कामगार संघटनेचे पदाधिकारी आवाक झाले आहेत. हा प्रकार कामगार संघटनेच्या बाबतीत होत असेल तर सामान्य नागरीकांच्या पत्र व्यवहाराचे काय झाले असेल असा सवाल संघनटेच्यावतीने उपस्थित करण्यात आला आहे.
( नक्की वाचा : Drug Racket: KDMC ड्रग्ज तस्कारांचा नवा अड्डा! डोंबिवलीतील आणखी एका घरात सापडला 2 कोटींचा साठा )
काय आहे प्रकरण?
मुन्सिपल कर्मचारी कामगार सेनेचे सरचिटणीस सचिन बासरे यांनी सांगितले की, त्यांची संघटना ही महापालिकेतील मान्यता प्राप्त संघटना आहे. या संघटनेच्या वतीने 14 जानेवारी 2024 ते 20 जून 2025 या कालावधीत कामगारांच्या प्रश्नावर विविध पत्र व्यवहार केला आहे. ई ई-ऑफिस प्रणाली द्वारे त्यांनी 28 पत्रे दिली आहेत. या पत्रांवर प्रशासाकडून काही एक उत्तर मिळत नसल्याने शुक्रवारी (11 जुलै) बासरे यांच्यासह सुरेश तेलवणे हे आयुक्त कार्यालयात पोहचले. आयुक्त कार्यालयातील सचिवाकडे याविषयी विचारणा केली. त्यांच्याकडून सांगण्यात आले की, त्यांना 28 पैकी एकही पत्र प्राप्त झालेले नाही. हे ऐकून संघटनेच्या पदाधिकाऱ्यांना धक्काच बसला.
बासरे यांनी सांगितले की, राज्यात ई गव्हर्नन्स राबविणारी राज्यातील पहिली महापालिका आहे. ई प्रणालीद्वारे पत्रे आयुक्त कार्यालयात पोहचणार नसतील तर सामान्य नागरीकांच्या समस्या आणि तक्रारींंची ई प्रणालीद्वारे पाठविलेली पत्रांचे काय झाले असेल? ई प्रणालीद्वारे पत्रे पोहचणार नसतील तर केवळ नावाला ई प्रणाली राबवून काय उपयोग असा प्रश्न बासरे यांनी उपस्थित केला आहे.