KDMC News : कल्याण-डोंबिवली महानगरपालिका (KDMC) मुख्यालयाच्या परिसरात बंदूकधारी अंगरक्षक बिनधास्तपणे फिरत असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. यामुळे महापालिकेच्या सुरक्षेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. या घटनेनंतर ठाकरे गटाने संताप व्यक्त करत, 'अशा लोकांना भारत-पाकिस्तान सीमेवर पाठवा,' अशी सडेतोड टीका केली आहे.
काय आहे प्रकरण?
कल्याण डोंबिवली महापालिका मुख्यालयात 27 गावांसंदर्भात एक बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीसाठी शिवसेना (शिंदे गट) चे नेते, पदाधिकारी आणि काही नागरिक उपस्थित होते. यावेळी काही नेत्यांसोबत 3 ते 4 बंदूकधारी अंगरक्षकही आले होते. हे अंगरक्षक कोणताही अडथळा न येता महापालिका मुख्यालयाच्या आवारात खुलेआम फिरताना दिसले. महापालिकेच्या नियमांनुसार, कोणत्याही व्यक्तीला अग्नीशस्त्रे घेऊन मुख्यालयात प्रवेश करण्यास मनाई आहे आणि सुरक्षा रक्षकांकडे ती जमा करण्याची सूचनाही लावलेली आहे. असे असतानाही या अंगरक्षकांना कोणीही हटकले नाही किंवा त्यांच्यावर कोणतीही कारवाई करण्यात आली नाही. यामुळे महापालिकेच्या सुरक्षा व्यवस्थेची पोलखोल झाली आहे.
( नक्की वाचा : Stray Dog : मुंबईजवळ भटक्या कुत्र्याची निर्घृण हत्या; डोळा काढून रस्त्यावर खेळत होता माथेफिरु )
ठाकरे गटाची संतप्त प्रतिक्रिया
या घटनेवर शिवसेना (ठाकरे गट) ने तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. ठाकरे गटाचे जिल्हाप्रमुख दिपेश म्हात्रे यांनी या प्रकरणावर जोरदार टीका केली. ते म्हणाले, "हे लोक जणू काही लढाईलाच चालले आहेत, अशा प्रकारे शस्त्रास्त्रे घेऊन फिरत होते. अशा लोकांना भारत-पाकिस्तान सीमेवर लढाईसाठी पाठवले पाहिजे. त्यांचे हे वर्तन अत्यंत खेदजनक आहे."
आयुक्तांनी दिले चौकशीचे आश्वासन
या घटनेची गंभीर दखल घेत केडीएमसी आयुक्त अभिनव गोयल यांनी चौकशीचे आश्वासन दिले आहे. या प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषींवर योग्य ती कारवाई केली जाईल, असे त्यांनी सांगितले आहे.
महापालिकेत राड्यांचा इतिहास
केडीएमसी मुख्यालयात यापूर्वीही अनेकदा राडे आणि वाद झाले आहेत. प्रशासकीय राजवट येण्यापूर्वी मात्तबर नगरसेवकांमध्ये जोरदार वाद होऊन अनेकदा पोलिसांना पाचारण करावे लागले होते. त्यावेळी वाहनांच्या तपासणीत हॉकी स्टिक, रॉड आणि इतर हत्यारेही सापडली होती. त्यामुळे महापालिकेतील सुरक्षा व्यवस्था नेहमीच चर्चेचा विषय राहिली आहे. काही दिवसांपूर्वीच कल्याण कोर्टात अशाच प्रकारे बंदूकधारी अंगरक्षक घेऊन फिरणाऱ्या एका व्यावसायिकावर कारवाई झाली होती. त्यामुळे आता या प्रकरणात काय कारवाई होते, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.