Ketan Agrawal Case: केतनचा जीव वाचला असता; सिया आणि चेतनने पोलिसांना सांगितला 'प्लॅन A'

Lohagad Ketan Agrawal Case : पोलीस तपासात समोर आलेल्या माहितीनुसार, केतनची होणारी पत्नी सिया गोयल आणि तिचा प्रियकर चेतन चौधरी यांनी सुरुवातीला केवळ केतनचा अपघात घडवून त्याला जखमी करण्याचा कट आखला होता

जाहिरात
Read Time: 3 mins

Ketan Agrawal Case: पुण्याजवळील लोहगड किल्ल्यावरून व्यावसायिक केतन अग्रवाल याला दरीत ढकलून ठार मारल्याच्या हाय-प्रोफाईल हत्याकांड प्रकरणात रोज नवे आणि धक्कादायक खुलासे होत आहेत. पोलीस तपासात समोर आलेल्या माहितीनुसार, मृत केतनची होणारी पत्नी सिया गोयल आणि तिचा प्रियकर चेतन चौधरी यांनी सुरुवातीला केवळ केतनचा अपघात घडवून त्याला जखमी करण्याचा कट आखला होता, जेणेकरून त्यांचे ठरलेले लग्न काही काळ लांबणीवर पडेल. मात्र, जखमी झाल्यानंतर जर केतनला या कारस्थानाचा सुगावा लागला, तर तो दोघांचा भांडाफोड करेल या भीतीने त्यांनी अखेर त्याला कायमचे संपवण्याचा क्रूर निर्णय घेतला.

केतन हा सिया आणि चेतन यांच्या नात्यात अडथळा बनल्यामुळे त्या दोघांनी त्याला ठार मारण्याचा कट रचला होता. सिया आणि चेतन यांना पळून जाऊन लग्न करायचे नव्हते. कारण त्यांना आपल्या कुटुंबाची बदनामी करायची नव्हती किंवा अग्रवाल यांच्या कुटुंबाला अडचणीत आणायचे नव्हते. त्यांनी सुरुवातीला हे लग्न होऊ नये यासाठी काही मार्ग शोधले. पोलिसांच्या म्हणण्यानुसार, लग्न पुढे ढकलता यावे यासाठी त्या दोघांनी सुरुवातीला चेतनला अपघातात जखमी करण्याचा विचार केला होता. मात्र, त्यातून ठोस काही हाती लागणार नाही याची कल्पना आल्यानंतर त्यांनी चेतनला ठार करण्याचा कट रचला.

Advertisement

चित्रपट पाहून आणि इंटरनेटवर सर्च करून आखला कट

तपासादरम्यान पोलीस अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, सिया आणि चेतन या दोघांनी हत्येचा कट रचण्यासाठी अनेक आठवडे घालवले. त्यांनी अनेक सस्पेन्स चित्रपट पाहिले तसेच पोलिसांपासून कसे वाचायचे, याबाबत इंटरनेटवर ऑनलाइन सर्च केले.

हत्या अपघाती वाटली पाहिजे आणि कोणताही पुरावा मागे राहू नये, यासाठी त्यांनी लोणावळ्यातील टायगर पॉईंट, विसापूर किल्ला आणि इतर काही ठिकाणांची पाहणी केली. ठिकाणांचे फोटो एकमेकांना शेअर केल्यानंतर त्यांनी अखेर लोहगड किल्ल्याची निवड केली, जिथून खाली ढकलल्यास मृत्यू अपघाती वाटू शकेल.

बाली ट्रिप आणि पासपोर्ट चोरीचा ड्रामा

केतन आणि सिया 6 जून रोजी आठ दिवसांच्या 'बाली' ट्रिपवर जाणार होते. या ट्रिपपूर्वीच त्याला संपवण्याचा त्यांचा घाईगडबडीत प्रयत्न सुरू होता. 31 मे रोजी सियाने केतनसोबत लोहगड किल्ल्याला पहिली भेट दिली. ही केवळ जागेची रेकी करण्यासाठी आखलेली भेट होती. बाली ट्रिप रद्द व्हावी यासाठी सियाने मुंबईत केतनचा पासपोर्ट चोरला, ज्यामुळे त्यांची परदेशवारी रद्द झाली. 14 जून  रोजी सियाने केतनला पुन्हा लोहगडवर नेऊन दरीत ढकलण्याचा प्रयत्न केला. मात्र, केतनने प्रसंगावधान राखून एका झुडपाचा आधार घेतला आणि तो वाचला. त्यावेळी सियाने "तूला सापापासून वाचवण्यासाठी मी धक्का दिला," असा बनाव रचून संशय दूर केला.

18 जून रोजी अखेर केतनला दरीत ढकलले

पहिला प्रयत्न अयशस्वी झाल्यानंतर प्रेमी चेतन चौधरी स्वतः या योजनेच्या अंमलबजावणीत सामील झाला. चेतनने सिया आणि केतनचा पाठलाग करत लोहगड गाठला. तेथे योग्य संधी साधून त्या दोघांनी मिळून केतनला खोल दरीत ढकलून दिले. गुन्ह्यापूर्वी दोघांनी पुण्यातील लुल्लानगर भागातील एका टेकडीवर या कृत्य प्रत्यक्ष कसे करायचे, याची तालीम देखील केली होती. पोलीस या प्रकरणाचा पुढील सखोल तपास करत आहेत.
 

Advertisement