पुण्याच्या कोरेगाव भीमा येथील विजयस्तंभाला वंदन करण्यासाठी लाखोंच्या संख्येने भीम अनुयायी दाखल होत आहेत. यंदा 207 वा शौर्य दिन साजरा होत असताना विजय स्तंभ रंगीबिरंगी फुलांनी सजवण्यात आला आहे. अशोक चक्राच्या खाली 'जय भीम'ची घोषणा लिहिली असून एका बाजूला डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची प्रतिमा तर दुसऱ्या बाजूला संविधानाच्या प्रस्ताविकेची प्रतिमा लावल्यात आली आहे. हा सोहळा सुरळीत पार पडावा यासाठी 6 हजार पोलिसांचा बंदोबस्त देखील तैनात करण्यात आला आहे.
207 वर्षांपूर्वी 1 जानेवारी 1818 मध्ये कोरेगाव भीमा येथे महार आणि इतर समाजातील सैनिकांच्या मदतीमुळे ब्रिटीशांनी पेशव्यांचा पराभव केला होता. महार सैनिकांचं शौर्य आणि त्यांना मिळालेल्या विजयाला मानवंदना देण्यासाठी दरवर्षी 1 जानेवारी रोजी येथे मोठ्या संख्येने आंबेडकर अनुयायी येत असतात. यंदाही सात ते आठ लाख अनुयायी कोरेगाव भीमा येथे दाखल होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
नक्की वाचा - Exclusive : पंतप्रधान मोदींचा पुन्हा महाराष्ट्र फोकस, महायुतीच्या सर्व आमदारांना खास निमंत्रण; कारण काय?
या दिनाच्या निमित्ताने प्रकाश आंबेडकरांनी ट्विट करून आंबेडकरी अनुयायांना शुभेच्छा दिल्या आहेत. कोरेगाव भीमा येथे 499 महार आणि 1 मातंग समाजाच्या सैन्याने ब्राम्हणवादी पेशव्यांच्या शासनावर विजय मिळवला, त्यातून प्रेरणा घ्या. त्यांच्या पराक्रमाची आठवण ठेवा. आज आणि नजीकच्या काळात जेव्हा कधी तुम्ही विजयस्तंभाला भेट द्याल तेव्हा आपल्या सैनिकांचा आदर ठेवा आणि बाबासाहेबांच्या आकांक्षा आणि महत्त्वाकांक्षा पूर्ण करण्यासाठी आपलं मत द्या.