भुपेंद्र अंबावणे,प्रतिनिधी
leopard Attack On Woman : शहापूर तालुक्यातील जांभूळवाड येथे आज सकाळी एक धक्कादायक घटना घडल्याने मोठी खळबळ उडाली आहे. बिबट्याच्या हल्ल्यात एक महिला गंभीर जखमी झाली आहे.या महिलेला उपचारासाठी शहापूर उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.अरुणा घरत असं जखमी महिलेचं नाव आहे. मिळालेल्या माहितीनुसार,दोन महिला पळसाची पाणे तोडण्यासाठी जंगलात गेल्या होत्या.त्यावेळी बिबट्याने पाठीमागून अरुणा यांच्यावर झडप घातली. त्यानंतर महिलेनं कोयत्याने बिबट्याचा प्रतिकार केला आणि त्या बिबट्याच्या हल्ल्यापासून बचावल्या. दरम्यान,अरुणा यांच्या मानेवर व गुडघ्यावर किरकोळ जखमा झाल्या आहेत.
...अन् बिबट्या जंगलात पळून गेला
याबाबत सविस्तर वृत्त असं की, शहापूर तालुक्यातील जांभूळवाड येथे राहणारे लोक रानमेवा तसेच लाकडाची फाटी पाने गोळा करण्यासाठी जवळच असलेल्या जंगलात जातात. आज सकाळी पळसाची पाने आणण्यासाठी दोन-तीन महिला जंगलात गेल्या होत्या. त्यादरम्यान अरुणा घरत या महिलेवर बिबट्याने मागून झडप घातली आणि हल्ला चढवला. त्याचवेळी महिलेनं कोयत्याने बिबट्याला प्रतिकार केला आणि बिबट्या जंगलात पळून गेला.
नक्की वाचा >>Thane News: टिटवाळ्यातील वयोवृद्ध दाम्पत्याचा मृतदेह मुरबाडमध्ये सापडला, पोटच्या मुलीनं केलं असं काही..
महिलेने न घाबरता कोयत्याने बिबट्याचा प्रतिकार केला
बिबट्याच्या हल्ल्यात अरुणा घरत किरकोळ जखमी झाल्या असून त्यांना उपचारासाठी शहापूर उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. अरुणा घरत यांच्या मानेवर व गुडघ्यावर किरकोळ जखमा झाल्या आहेत. महिलेने न घाबरता तिच्या हातातील कोयत्याने बिबट्याचा प्रतिकार केला आणि ती या हल्ल्यातून सुखरूप वाचली.