जाहिरात

Leopard Video: रात्रीच्या अंधारात बिबट्याची झडप! भांडुपमध्ये दहशतीचे सावट; रहिवाशांचा घराबाहेर पडण्यासही नकार

Bhandup Leopard News : भांडुप येथील अमरकोर शाळेच्या परिसरात मध्यरात्री बिबट्याचा वावर असल्याचे समोर आले आहे.

Leopard Video: रात्रीच्या अंधारात बिबट्याची झडप! भांडुपमध्ये दहशतीचे सावट; रहिवाशांचा घराबाहेर पडण्यासही नकार
Bhandup Leopard Terror : या घटनेमुळे भांडुपमधील रहिवाशांमध्ये भीतीचं वातावरण आहे.
मुंबई:

ऋतिक गणकवार, प्रतिनिधी 

Bhandup Leopard News : मुंबईतील आरे कॉलनी आणि संजय गांधी नॅशनल पार्कच्या परिसरातील बिबट्याचा वावर आता नवीन राहिलेला नाही. मात्र, आता हे संकट शहराच्या मध्यवर्ती भागात पसरू लागल्याने मुंबईकरांची चिंता वाढली आहे. पूर्व उपनगरातील भांडुप सारख्या गजबजलेल्या भागात चक्क बिबट्याचे दर्शन झाल्याने खळबळ उडाली असून नागरिकांमध्ये भीतीचे प्रचंड वातावरण पसरले आहे.

भांडुपमधील अमरकोर शाळा परिसरात थरार

भांडुप येथील अमरकोर शाळेच्या परिसरात मध्यरात्री बिबट्याचा वावर असल्याचे समोर आले आहे. ही शाळा आणि लगतचा परिसर रहिवासी वस्तीने वेढलेला असतानाही बिबट्याने येथे शिरकाव केल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे. 

शाळेच्या संरक्षण भिंतीवरून बिबट्या परिसरात आल्याची माहिती प्रत्यक्षदर्शींनी दिली आहे. शाळा आणि मैदानांच्या आसपास बिबट्या फिरत असल्याने पालकांमध्ये आपल्या मुलांच्या सुरक्षेबाबत मोठी काळजी व्यक्त केली जात आहे.

( नक्की वाचा : Rupali Chakankar: भोंदू अशोक खरातशी मैत्री पडली महागात; मुख्यमंत्र्यांची रुपाली चाकणकरांवर केली मोठी कारवाई )

संरक्षण भिंतीवरून बिबट्या कुत्र्यासह कोसळला

या घटनेचा सर्वात थरारक प्रकार तेव्हा घडला जेव्हा बिबट्याने परिसरातील एका कुत्र्यावर झडप घातली. बिबट्याने कुत्र्याला आपल्या जबड्यात पकडले आणि पुन्हा संरक्षण भिंतीवरून बाहेर पडण्याचा प्रयत्न केला. 

मात्र, कुत्र्याला घेऊन भिंत ओलांडताना बिबट्याचा तोल गेला आणि तो कुत्र्यासह खाली कोसळला. हा सर्व प्रकार अत्यंत भयानक होता. बिबट्याच्या या हल्ल्यानंतर परिसरात रक्ताचे डाग आणि संघर्षाच्या खुणा पाहायला मिळाल्या आहेत.

नागरिकांमध्ये भीती आणि दहशतीचे सावट

भांडुपमध्ये यापूर्वी बिबट्याचा वावर इतक्या उघडपणे कधीच दिसला नव्हता. त्यामुळे अमरकोर शाळा आणि आजूबाजूच्या सोसायट्यांमधील नागरिक आता घराबाहेर पडायला घाबरत आहेत. रात्रीच्या वेळी तर संपूर्ण शुकशुकाट पाहायला मिळत आहे. बिबट्याने कुत्र्यावर हल्ला केल्याने आता लहान मुले आणि ज्येष्ठ नागरिकांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. वन विभागाने तातडीने या ठिकाणी पिंजरा लावावा, अशी मागणी रहिवासी करत आहेत.

वन विभागाचे आवाहन आणि खबरदारी

घटनेची माहिती मिळताच वन विभागाच्या पथकाने परिसरात पाहणी केली आहे. बिबट्याचा वावर असलेल्या भागात रात्रीच्या वेळी एकटे फिरू नका, लहान मुलांना सोबत ठेवा आणि परिसरात पुरेसा उजेड ठेवा, अशा सूचना प्रशासनाकडून देण्यात आल्या आहेत. आरे कॉलनीनंतर आता बिबट्या भांडुपच्या मानवी वस्तीत शिरल्याने मानवी आणि वन्यजीव संघर्षाचा नवा अंक सुरू झाल्याचे चित्र दिसत आहे.

इथे पाहा VIDEO

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com