'दरीदरीतून नाद गुंजला महाराष्ट्र माझा'; महाराष्ट्र दिनानिमित्त राज्यभरात कार्यक्रमांची रेलचेल

आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी महाराष्ट्र दिनी हुतात्मा चौकातून हुताम्यांना अभिवादन केलं.

जाहिरात
Read Time: 2 mins
मुंबई:

64 वर्षांपूर्वी 1960 रोजी महाराष्ट्र राज्याची स्थापना करण्यात आली. त्यानिमित्ताने राज्यभरात विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे. आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी महाराष्ट्र दिनी हुतात्मा चौकातून हुताम्यांना अभिवादन केलं. राज्यातील इतर भागातही विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे.

कोल्हापुरात आज महाराष्ट्र दिनानिमित्त विविध कार्यक्रम राबवले जात आहेत. आज सकाळी 8  वाजता शाहू स्टेडियमवर शासकीय कार्यक्रम पार पडत आहे. पालकमंत्री हसन मुश्रीफ यांच्या हस्ते ध्वजारोहण करुन हा दिवस साजरा केला जाणार आहे. जिल्ह्यातील एमआयडीसी, शासकीय कार्यालये आणि अनेक संस्था संघटनांमध्ये या दिनानिमित्त कार्यक्रम राबवले जात आहेत.विविध ठिकाणी बांधकाम मजुर असतील अन्य कर्मचारी यांच्यासाठीच्या योजनांची माहिती दिली जात आहे. एकंदरीतच संपूर्ण राज्यभरासह जिल्ह्यात आज महाराष्ट्र दिन मोठ्या उत्साहात साजरा केला जात आहे.

नाशिकच्या पोलीस परेड ग्राउंडवर 1 मे महाराष्ट्र दिनानिमित्त आज पालकमंत्री दादा भुसे यांच्या हस्ते ध्वजारोहण होणार असून या ठिकाणी ग्राउंड पूर्णपणे सजवण्यात आले आहे. सकाळी आठ वाजल्यापासून कार्यक्रमांची सुरुवात होईल. या कार्यक्रमात विभागीय अधिकारी व जिल्हाधिकारी यांच्यासह प्रशासनाचे अधिकारी देखील सहभागी होतील. या ठिकाणी पोलीस परेड ग्राउंडवर रांगोळी देखील काढण्यात येत आहेत. या ठिकाणी मतदानाचा अधिकार म्हणून सेल्फी पॉईंट देखील बनवण्यात आला आहे. 

Advertisement

('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )

नागपुरातील कस्तुरचंद पार्क येथे आज सकाळी आठ वाजता महाराष्ट्र दिनाचा कार्यक्रम होणार आहे. यावेळी उपमुख्यमंत्री आणि नागपूर जिल्ह्याचे पालकमंत्री देवेंद्र फडणवीस उपस्थित राहतील. तगड्या सुरक्षेत हा कार्यक्रम घेण्यात येणार आहे. दरम्यान आज सकाळी नागपूर शहरात तीन ठिकाणी काही विदर्भवादी संघटना निषेध दिनाचा कार्यक्रम घेणार आहेत. यात विदर्भ राज्याचा झेंडा फडकवणे, काळी फीत लावून सत्याग्रह, बैठा सत्याग्रह असे काही कार्यकर्त्यांचे उपस्थितीत कार्यक्रम होणार आहेत.