विधानसभा निवडणुकीतून अर्ज माघार घेण्यासाठी आज शेवटचा दिवस आहे. माहीम विधानसभा मतदारसंघातून शिवसेना शिंदे गटाचे उमेदवा सदा सरवणकर उमेदवारी मागे घेणार का? असा प्रश्न उपस्थित होत आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून अमित ठाकरे निवडणुकीच्या मैदानात आहेत. महायुतीने अमित ठाकरे यांना पाठिंबा द्यावा, अशी भूमिका भाजपची आहे. मात्र सदा सरवणकर निवडणूक लढण्यावर ठाम होते. मात्र आता सदा सरवणकर यांना माघार घेण्याचे संकेत दिले आहेत.
सदा सरवणकर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या भेटीसाठी गेले आहेत. उमेदवारी अर्ज मागे घेण्यासाठी अवघे काही तास शिल्लक असताना सदा सरवणकर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या भेटीला गेले आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याशी चर्चा करून सदा सरवणकर त्यांचा अंतिम निर्णय घेणार आहेत.
(नक्की वाचा- मनोज जरांगे पाटलांचा काही तासांत यू-टर्न; विधानसभा निवडणुकीतून माघार)
त्याआधी माध्यमांशी बोलताना सदा सरवणकर यांनी म्हटलं की, कार्यकर्त्यांची इच्छा आहे मीच का उमेदवारी मागे घ्यायची. एक लोकप्रतिनिधी इतकी वर्ष काम करतोय, तर त्यानेच का उमेदवारी मागे घ्यावी. मी उमेदवारी घ्यावी असं वाटत असेल तर मुंबईतील महायुती विरुद्ध लढणाऱ्या मनसेच्या उमेदवारांनीही उमेदवारी मागे घ्यावी ही माझी मागणी होती.
मुख्यमंत्र्यांचा मला फोन आला होता. मुंबईतील मनसेचे उमेदवार माघार घ्यायला तयार आहेत. पक्षहिताचा निर्णय मी नेहमीच घेतला आहे. जर मनसे सर्व उमेदवार मागे घेणार असेल आणि आम्हाला फायदा होणार असेल तर केवळ आमदारकीसाठी अडून बसणे संयुक्तिक होणार नाही, असंही सदा सरवणकर यांनी म्हटलं आहे.
(नक्की वाचा- पालघरमध्ये चाललंय काय? एका मागोमाग नेते का होत आहेत गायब?)
एकनाथ शिंदे पुन्हा मुख्यमंत्री व्हावेत ही आमची सर्वांची इच्छा आहे. त्यासाठी जास्तीत जास्त महायुतीचे आमदार निवडून आले पाहिजेत. दादरमधून धनुष्याबाण आणि बाळासाहेबांचे विचार विधानभवनात जाणे ही काळाची गरज, असं मत देखील सदा सरवणकर यांनी व्यक्त केलं.
एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्री बनवायचं असेल तर कोणाचा तरी बळी द्यावाच लागेल. मनसेने महायुतीविरोधात उमेदवार दिले तर त्याचा फटका महायुतीलाच बसणार आहे. मात्र मी काय निर्णय घ्यावा याचं पूर्ण स्वातंत्र्य मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मला दिलं आहे, असंही सदा सरवणकर यांनी म्हटलं.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world