गुटखा आणि अन्नभेसळ रोखण्यासाठी महाराष्ट्र अन्न व औषध प्रशासन (FDA) विभागाने अत्यंत कठोर पावले उचली आहेत. या विभागाच्या आयुक्त पदावर तुकाराम मुंढे यांची नियुक्ती झाल्यानंतर त्यांनी अन्न भेसळी विरुद्ध धडक कारवाई सुरू केली आहे. शिवाय गुटखा विक्रीला ही त्यांनी चाप लावला आहे. तुकाराम मुंढे यांनी स्पष्ट केले आहे की, आता केवळ गुटखा उत्पादक किंवा विक्रेतेच नव्हे, तर अशा आरोग्यास घातक ठरणाऱ्या पदार्थांचे निष्काळजीपणाने प्रमोशन करणाऱ्या बड्या सेलिब्रिटीजवरही कायदेशीर कारवाई केली जाईल. त्यामुळे बॉलिवूडचे काही दिग्गज मुंढेंच्या रडारवर आले आहेत.
महाराष्ट्राच्या इतिहासात प्रथमच गुटखा माफियांवर थेट 'मकोका' (MCOCA) अंतर्गत कारवाई करण्यात आली आहे. या कारवाईने संपूर्ण क्षेत्रात खळबळ उडाली आहे. मात्र, आता ही कारवाई केवळ उत्पादकांपर्यंत मर्यादित राहीली नाही. जनतेची दिशाभूल करणाऱ्या जाहिरातींमध्ये दिसणाऱ्या बड्या बॉलिवूड कलाकारांपर्यंत पोहोचणार आहे. कायद्यासमोर कोणीही लहान किंवा मोठा नसतो. जर एखादा ब्रँड ठरवून दिलेल्या निकषांचे उल्लंघन करत असेल, तर त्या वस्तूची जाहिरात करणाऱ्या कलाकारांवरही भेदभाव न करता नोटीस बजावली जाईल," असे तुकाराम मुंढे यांनी स्पष्ट केले.
तुकाराम मुंढे यांच्या या इशाऱ्यामुळे बॉलिवूडमधील काही कालाकारांचे धाबे दणाणले आहेत. तुकाराम मुंढे यांच्या कामाची स्टाईल ही सर्वां पेक्षा वेगळी आहे. ते जे काम करतात ते कायद्याच्या चौकटीत आणि नियमात राहून करतात. त्यामुळे या कलाकारांवर कारवाई कशा पद्धतीने होते याबाबत मात्र आतापासूनच उत्सुकता आहे. मुंढे यांनी कारवाई बाबत संकेत दिले आहेत. त्यामुळे कलाकार ही अशा जाहीरातीतून आपलं अंग काढून घेतात का हे पहाणे महत्वाचे ठरणार आहे.
तुकाराम मुंढे यांनी एफडीएची सूत्रे हाती घेतल्यानंतर राज्यभरात छापेमारीचा धडाका सुरू आहे. राज्यभरातून आतापर्यंत 12.59 कोटी रुपयांचा अवैध गुटखा जप्त करण्यात आला आहे. एकूण 439 एफआयआर (FIR) नोंदवण्यात आल्या आहेत. शिवाय 598 जणांना अटक करण्यात आली आहे. दररोज सरासरी 20 पेक्षा जास्त ठिकाणी अचानक धाडी टाकल्या जात आहेत. गेल्या 2 महिन्यांत 1500 हून अधिक यशस्वी छापे मारण्यात आले असून दररोज मिळणाऱ्या 500 ते 1100 तक्रारींवर तात्काळ निर्णय घेतला जात आहे.