प्रांजल कुलकर्णी
गोदावरी नदीने धोक्याची पातळी ओलांतली. त्यानंतर नाशिक पासून 20 किलोमिटर अंतरावर असलेल्या चांदोरी गावातील गावकऱ्यांच्या पोटात गोळा आला. त्याला कारण ही तसेच आहे. गोदावरीने पाण्याची तापळी ओलांडल्यानंतर हे संपूर्ण गाव पाण्या खाली गेलं. पाण्याने जणू या गावाला वेढाच टाकला. संपूर्ण गावाचा संपर्क तुटला. रात्रीच्या वेळी अचानक गावात पाणी शिरल्याने एकच खळबळ उडाली. भितीचं वातावरण निर्माण झालं. प्रशासनाने तातडीने आतापर्यंत जवळपास 400 कुटुंबाना सुरक्षित स्थळी हलवल्याचं जिल्ह्याचे मुख्य कार्यकारी अधिकारी ओमकार पवार यांनी सांगितले. पण या पाण्याचे वेढ्यामुळे गावाची स्थिती भयावह झाली आहे.
घरा घरात जवळपास चार ते पाच फुट पाणी शिरलं होतं. संपूर्ण बाजारपेठ पाण्याखाली होती. तिथे दुकानाचं किती नुकसान झालं याचा आकडाच सांगता येणार नाही. नदीकाठी असलेल्या चांदोरी गावच्या खालची आळी परिसरात तर नागरिकांच्या घरात 3-4 फुटापर्यंत पाणी जाऊन पोहोचले होते. गावाला जाणारा मुख्य रस्त्यावर गुडघाभर पाणी साचल्याने सर्वच दुकानांमध्ये पाणी गेले. त्यात व्यावसायिकांचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे. गावातील वीजपुरवठा देखिल रात्रीपासून खंडीत झाला होता. त्यामुळे तर गावकऱ्यांना मोठा मनस्ताप सहन करावा लागला. मात्र तरी गावकऱ्यांनी धीर सोडला नाही. या प्रसंगाला त्यांनी तोंड दिले.
चांदोरी-सायखेडा या दोन्ही गावांना जोडणारा पूल पूर्णतः पाण्याखाली गेलो होता. त्यामुळे या दोन्ही गावांचा संपर्क तुटला होता. पात्र सोडून नदीचे पाणी थेट गावात शिरलं होतं. त्यामुळे मोठ्या प्रमाणावर शेती देखील पाण्याखाली गेली आहे. गावातील शाळा ही पाण्या खालीच होती. ज्यांची घरं दुमजली होती त्यांनी दुसऱ्या मजल्यावर आश्रय घेतला. काही जण आपलं घरातील सामान घेवून सुरक्षित स्थळी जात होते. ते गुडघाभर पाण्यातून वाट काढत होते. या पुरामुळे गावाचं मोठं नुकसान झाल्याचं गावकरी सांगतात. खास करू शेतीचं मोठं नुकसान झाल्याचं काहींनी सांगितलं. तर बाजारपेठेत ज्यांची दुकानं होती त्यांनी ही हा आमच्यासाठी मोठा फटका असल्याचं सांगितलं. दुकानात अडीच त तीन फुट पाणी होतं.
सध्या चांदोरी आणि सायखेडा इथं वेगवेगळ्या उपाययोजना केल्या जात असल्याचं नाशिकचे मुख्य कार्यकारी अधिकारी ओमकार पवार यांनी सांगितले. दोन्ही गावातील जवळपास 400 कुटुंबांना स्थलांतरीत करण्यात आल्याची माहिती ही त्यांनी दिली आहे. त्यात काही जणांना जिल्हा परिषद शाळा, ग्रामपंचायत आणि मंदिरात आश्रय देण्यात आल्याचं त्यांनी सांगितलं. काही लोक त्यांच्या नातेवाईकांकडे गेले आहे. सध्या गावाचा पाणी पुरवठा खंडीत झाला आहे. त्यामुळे गावकऱ्यांना पिण्यासाठी आरओचे पाणी दिले जात आहे. शिवाय ज्या ठिकाणी पुराचे पाणी आहे, त्या ठिकाणी लोकांना जाण्यास मज्जाव केला जात असल्याचं पवार यांनी सांगितले.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world