महाराष्ट्रात अन्न सुरक्षा आणि स्वच्छतेच्या बाबतीत पुणे जिल्हा आघाडीवर असल्याचे चित्र समोर आले आहे. अन्न आणि औषध प्रशासनाने (FDA) सुरू केलेल्या नवीन ऑनलाईन तक्रार निवारण पोर्टलवर संपूर्ण राज्यातून सर्वाधिक तक्रारी पुणे जिल्ह्यातून नोंदवण्यात आल्या आहेत. यामध्ये बहुतांश तक्रारी हॉटेल्स आणि खाद्यपदार्थ विक्रेत्यांकडून पुरवल्या जाणाऱ्या अस्वच्छ अन्नाबाबत आहेत, अशी अधिकृत माहिती एफडीए आयुक्त तुकाराम मुंढे यांनी दिली आहे. मराठा चेंबर ऑफ कॉमर्स, इंडस्ट्रीज अँड ॲग्रीकल्चर (MCCIA) तर्फे पुण्यात आयोजित अन्न सुरक्षा परिषदेत प्रसारमाध्यमांशी बोलताना त्यांनी ही आकडेवारी जाहीर केली.
24 तासांत 10 लाख हिट्स
नागरिकांना अन्नपदार्थांमधील भेसळ किंवा अस्वच्छतेविरुद्ध थेट आवाज उठवता यावा, यासाठी एफडीएने नुकतेच "complaints.mahafda.in" हे नवीन पोर्टल सुरू केले आहे. हे पोर्टल सुरू होताच अवघ्या 24 तासांत तब्बल 10 लाख लोकांनी या संकेतस्थळाला भेट दिली आणि हजारो तक्रारींचा पाऊस पडला.
नवीन डिजिटल प्रणालीनुसार, पोर्टलवर तक्रार नोंदवल्यानंतर संबंधित क्षेत्राच्या एफडीए संयुक्त आयुक्तांना 24 तासांच्या आत त्याची दखल घ्यावी लागेल. ही तक्रार त्वरित एका अधिकाऱ्याकडे सोपवली जाईल. जर त्या अधिकाऱ्याने विहित वेळेत आवश्यक ती कायदेशीर कारवाई केली नाही, तर ती तक्रार आपोआप विभागातील वरिष्ठ अधिकाऱ्याकडे वर्ग केली जाईल. यामुळे यंत्रणेत पारदर्शकता आणि उत्तरदायित्व निर्माण होईल.
चुकीचे काम करणाऱ्यांवर 'ब्लॉकचेन'चा वॉच
आपल्या शिस्तप्रिय आणि कडक कार्यपद्धतीसाठी प्रसिद्ध असलेले आयुक्त तुकाराम मुंढे यांनी सांगितले की, ज्या खाद्य व्यावसायिकांवर किंवा हॉटेल्सवर यापूर्वी कारवाई झाली आहे, त्यांच्या नोंदी ठेवण्यासाठी एफडीए आता 'ब्लॉकचेन तंत्रज्ञानाचा' वापर करण्याच्या विचारात आहे. जेणेकरून कोणत्याही जुन्या गुन्हेगाराला पळवाट शोधता येणार नाही.
त्यांनी सर्व हॉटेल्स, रेस्टॉरंट्स आणि खाद्य व्यावसायिकांना अन्न सुरक्षा व्यवस्थापन प्रणालीचे पालन करण्याचे आणि 'एफएसएसएआय' (FSSAI) ने घालून दिलेल्या सर्व 22 प्रमुख नियमांचे काटेकोर पालन करण्याचे आवाहन केले आहे.