मुंबईजवळ होत असलेले वाढवण बंदर तसेच नवी मुंबई येथील आंतरराष्ट्रीय विमानतळामुळे महाराष्ट्राची अर्थव्यवस्था मोठ्या उंचीवर जाईल. त्यामधून सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योगांना मोठी चालना मिळेल, असे प्रतिपादन राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांनी केले.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
'विकसित भारतासाठी लघु - मध्यम उद्योग क्षेत्राचा शाश्वत विकास' या विषयावरील शिखर परिषदेचे उद्घाटन राज्यपाल राधाकृष्णन यांच्या प्रमुख उपस्थितीत बुधवारी (5 मार्च 2025) मुंबईत झाले, त्यावेळी ते बोलत होते. या परिषदेचे आयोजन महाराष्ट्र इंडस्ट्रिअल डेव्हलपमेंट असोसिएशन आणि SME चेंबर ऑफ इंडिया यांनी केले होते.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली भारताला 5 ट्रिलियन डॉलर्सची अर्थव्यवस्था बनवण्यात लघु व मध्यम उद्योगांचे योगदान महत्वाचे राहील. मोठे उद्योग, लघु उद्योग तसेच सूक्ष्म उद्योग परस्परांना पूरक असतात त्यामुळे सूक्ष्म, लघु व मध्यम उद्योग वाढले तर त्यांनी मोठ्या उद्योगांना देखील मदत होईल असे राज्यपालांनी सांगितले.
( नक्की वाचा : पालघरमधील वाढवण बंदर ठरेल संपूर्ण देशासाठी गेमचेंजर, थेट चाबहारशी आहे कनेक्शन )
विकसित भारताचे लक्ष गाठण्यासाठी देशातील प्रत्येक व्यक्तीला आपले योगदान देणे आवश्यक आहे. जपानच्या प्रगतीमध्ये सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योगांचे योगदान फार मोठे आहे. औद्योगिक विकासात लघु आणि मध्यम उद्योगांची भूमिका अतिशय महत्वाची असून या दृष्टीने SME चेंबर लघु उद्योगांना सक्षम करण्याचे उत्तम कार्य करीत आहे.
राज्यपालांच्या हस्ते यावेळी राज्यातील विविध लघु आणि मध्यम उद्योगांना 23 वे "इंडिया SME उत्कृष्टता पुरस्कार" आणि 14 वे "प्राइड ऑफ महाराष्ट्र" पुरस्कार प्रदान करण्यात आले. यावेळी राज्यपालांच्या हस्ते राष्ट्रीय लघु व माध्यम उद्योग उत्पादकता अभियान, SME टीव्ही आणि SME लीगल सेलचे उद्घाटन करण्यात आले.