Maharashtra Local Body Elections: राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांची गेल्या अनेक दिवसांपासून असलेली प्रतीक्षा अखेर संपली आहे. राज्याचे मुख्य निवडणूक आयुक्त दिनेश वाघमारे यांनी सोमवारी, (15 डिसेंबर 2025) रोजी पत्रकार परिषदेत 29 महानगरपालिकांच्या सार्वत्रिक निवडणुकांचा कार्यक्रम घोषित केला. या घोषणेमुळे आजपासूनच संबंधित महापालिका क्षेत्रांमध्ये आचारसंहिता लागू झाली आहे.
निवडणूक कार्यक्रमाचे वेळापत्रक
29 महापालिकांमध्ये एकूण 2869 जागांसाठी हे मतदान होणार आहे. निवडणुकीचा महत्त्वाचा कार्यक्रम पुढीलप्रमाणे आहे.
उमेदवारी अर्ज भरण्याची मुदत - 23 डिसेंबर ते 30 डिसेंबर 2025
उमेदवारी अर्जाची छाननी - 31 डिसेंबर 2025
उमेदवारी अर्ज मागे घेण्याची मुदत - 2 जानेवारी 2026
महापालिका निवडणुकांसाठी मतदान - 15 जानेवारी 2026
महापालिका निवडणुकांसाठी मतमोजणी - 16 जानेवारी 2026
निवडणूक आयोगाने स्पष्ट केले आहे की, मतदानाच्या 48 तास आधी प्रचार थांबवण्यात येईल. अर्ज ऑफलाइन पद्धतीने स्वीकारले जाणार आहेत, तर जात वैधता प्रमाणपत्र (Cast Validity Certificate) अर्ज सादर केल्यानंतर सहा महिन्यांच्या आत देणे बंधनकारक असेल.
( नक्की वाचा : Local Body Elections: तुमच्या नगरपालिकेचे मतदान दोनदा होणार? 'या' कारणामुळे आयोगाचा मोठा निर्णय, वाचा सविस्तर )
मतदार संख्या आणि मतदान व्यवस्था
या निवडणुकीसाठी 1 जुलैची मतदार यादी ग्राह्य धरली जाणार आहे. या यादीनुसार, राज्यात एकूण 2 कोटी 4 लाख 450 मतदार आहेत, ज्यात 1 कोटी 83 हजार पुरुष मतदार, 1 कोटी 21 हजार महिला मतदार आणि 450 इतर मतदारांचा समावेश आहे.
- राज्यात एकूण 39 हजार मतदान केंद्र असतील.
- या निवडणुका इलेक्ट्रॉनिक व्होटिंग मशीनवर (EVM) घेण्यात येतील.
- एकट्या मुंबई महापालिकेसाठी 10 हजार मतदान केंद्र आणि 11 हजार कंट्रोल युनिट्स असणार आहेत.
- निवडणूक प्रक्रिया पार पाडण्यासाठी 1 लाख 96 हजार कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
विशेष सुविधा: निवडणूक आयोगाने दिव्यांग, ज्येष्ठ नागरिक आणि गर्भवती महिलांना मतदान केंद्रावर प्राधान्य देण्याची तसेच सर्व सोईसुविधा उपलब्ध करून देण्याची घोषणा केली आहे.यासोबतच काही 'आदर्श मतदान केंद्र' तयार करण्यात येतील, जिथे केवळ महिला कर्मचारी असतील. स्टार प्रचारकांची संख्या 20 वरून 40 करण्यात आली आहे.
प्रभाग रचना आणि दुबार मतदारांचा मुद्दा
या निवडणुकीत जालना आणि इचलकरंजी या दोन *नव्याने स्थापन झालेल्या* महापालिकांचाही समावेश आहे, ज्यामुळे महापालिकांची एकूण संख्या 29 झाली आहे. मुंबई महापालिकेत 'एक प्रभाग पद्धत' असेल. इतर 28 महापालिकांमध्ये* प्रभाग रचनेनुसार निवडणुका होणार आहेत. यामध्ये काही ठिकाणी तीन सदस्यांचा प्रभाग असेल, तर काही ठिकाणी चार सदस्यांचा प्रभाग असेल.
दुबार मतदारांवर स्पष्टीकरण
निवडणूक आयोगाने पत्रकार परिषदेत 'दुबार मतदार' (Double Voters) आढळल्याच्या मुद्द्यावरही स्पष्टीकरण दिले.
- राज्य निवडणूक आयोगाने ही मतदार यादी केंद्रीय निवडणूक आयोगाकडून घेतली आहे. त्यामुळे यामध्ये नाव कमी करणे किंवा वाढवणे, यासारखे बदल करण्याचे अधिकार राज्य आयोगाकडे नव्हते.
- ज्या मतदारांची नावे संभाव्य दुबार म्हणून आढळली आहेत, त्यांच्या नावापुढे 'डबल स्टार' (**) असे नमूद करण्यात आले आहे.या संभाव्य दुबार मतदारांच्या घरी जाऊन आयोगाने हमीपत्रे लिहून घेतली आहेत, ज्यात त्यांनी कोणत्या केंद्रावर मतदान करणार हे स्पष्ट केले आहे.
मतदार यादीची अंतिम जबाबदारी केंद्रीय निवडणूक आयोगाची असून, विरोधी पक्षांच्या आरोपांवर हे स्पष्टीकरण देत असल्याचे आयोगाने सांगितले.
कोणत्या महापालिकांमध्ये निवडणूक?
या 29 महापालिकांमध्ये महाराष्ट्रातील प्रमुख शहरे समाविष्ट आहेत:
मुंबई, ठाणे, नवी मुंबई, पनवेल, कल्याण-डोंबिवली, उल्हासनगर, भिवंडी-निजामपूर, वसई-विरार, भाईंदर, पुणे, पिंपरी-चिंचवड, नाशिक, मालेगाव, जळगाव, धुळे, अहमदनगर, इचलकरंजी (नवीन), कोल्हापूर, सोलापूर, सांगली-मिरज, चंद्रपूर, अकोला, अमरावती, नागपूर, लातूर, जालना (नवीन), परभणी, छत्रपती संभाजीनगर आणि नांदेड.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world